गेल्या काही दिवसापासून राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लाऊडस्पीकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन मशिदींच्या ट्रस्टीविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.
वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईच्या सांताक्रूझ पोलिसांनी लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीशी संबंधित लोकांवरही नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवार,५ मे रोजी सकाळी वांद्रे येथील नुरानी मशिदीमध्ये लाऊडस्पीकरवर नमाज अजान करण्यात आली. सकाळी ६ च्या आधी लाऊडस्पीकर न वापरण्याबाबत पोलिसांनी एक दिवस अगोदर सूचना देऊनही मशिदीत सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरण्यात आले आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग करत लाऊडस्पीकरवर दुपारची अजान मोठ्या आवाजात देण्यात आली. पोलिसांनी याची दखल घेत घटनास्थळी पोहोचून लाऊडस्पीकर मशीन ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमांनुसार कारवाई करून तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा:
बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम
ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?
‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’
विलेपार्लेतील एलआयसी कार्यालयाला आग
सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कोणी स्पीकर वाजवत असेल, तर निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुंबईतील २६ मशिदींनी भोंग्यावरुन अजान लावणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. भोंगे लावण्यासाठी आता स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे.