मराठी भाषेत बोलण्याची विनंती करणाऱ्या तरुणाला माफी मागण्यास भाग पाडणाऱ्यांविरोधात गुन्हा

मुंब्रा पोलिसांची कारवाई

मराठी भाषेत बोलण्याची विनंती करणाऱ्या तरुणाला माफी मागण्यास भाग पाडणाऱ्यांविरोधात गुन्हा

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी असा वाद समोर आला. यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मराठी बोलायला सांगितले म्हणून एका तरुणाला जमावाने दमदाटी करत माफी मागायला भाग पडल्याची घटना घडली. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. यानंतर आता तरुणाला मराठी भाषेमध्ये बोलण्याची विनंती करणाऱ्या तरुणाला माफी मागण्यास सांगणाऱ्या व्यक्तींवर मुंब्रा पोलिसांनी कारवाई केली आहे.

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार, २ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास कौसा आयडियल मार्केट, अंबाजी मेडिकल समोरून एका मराठी तरुणाने फळ विक्रेत्याकडून फळे विकत घेताना त्याला मराठीत बोलण्याची विनंती केली. त्यानंतर फळविक्रेत्याने तरुणासोबत वाद घातला आणि त्याने एस. डी. पी. आय. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावुन गर्दी जमा केली. यानंतर या लोकांनी मराठी तरुणाला घेराव घालून कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले आणि त्याचा व्हिडीओ बनवुन तो सोशल मिडीयावर प्रसारित केला. यानंतर मराठी आणि हिंदी भाषिक यांच्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे व्हिडीओची गंभीर दखल घेत पोलिसांनी फळ विक्रेता शोएब मोहम्मद नसीम कुरेशी, व्हिडीओमधील एस. डी. पी. आय. पक्षाचे पदाधिकारी अब्दुल रहेमान दिलशाद अन्सारी, उजेर जाफर आलम शेख तसेच २० ते २५ अज्ञात तरुण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : 

छत्तीसगडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

रोहित शर्मा टीममधून बाहेर, काय म्हणाला, ऋषभ पंत?

मी स्वतःसाठी काचेचा महाल नाही, तर गरिबांना घरे बांधली!

काश्मीरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी कटिबद्ध

मुंब्रा पोलीस स्टेशन येथे सरकारतर्फे गु.र.नं.१२/२०२५ म.पो.का. कलम ३७ (३) १३५ प्रमाणे तसेच फिर्यादी मारूती गवळी यांचा जबाब नोंद करून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९६, १३५, ३५३ (२), ३५१ (२) (३), ३५२, १२७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे या प्रकरणाचा तपास मा. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

प्रकरण काय?

डायघर भागात राहणारा २१ वर्षीय तरुण गुरुवारी दुपारच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा भागात फळ विक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला. त्यामुळे मराठी बोला असे तो तरुण फळ विक्रेत्याला म्हणाला. महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे मी मुंब्रा बंद करुन टाकेन असं वक्तव्य या तरुणाने केले. पुढे फळ विक्रेता आणि तरुणामध्ये वाद झाला. या वादानंतर फळ विक्रेत्याने त्याच्या सहकाऱ्यांना बोलावले आणि त्यांनी या तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. तसेच तो माफी मागत असल्याचे चित्रीकरणही प्रसारित केले.

Exit mobile version