सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांनी केलेल्या विधानाचे पडसाद सध्या राज्यभर उमटताना दिसत आहेत. दरम्यान, रविवारी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्यात आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी ‘सर तन से जुदा’ ही घोषणा देण्यात आल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली आहे.
सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले होते. असाच रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रविवारी आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनावेळी जमलेल्या नागरिकांकडून ‘सर तन से जुदा’ आणि टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी कारवाई केली आहे.
घटनेचा व्हिडीओ समोर येताच पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्यात आली असून तब्बल ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. विनापरवानगी मोर्चा काढणे, मोर्चामध्ये बेकायदेशीरपणे सामील होऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीसचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार जवळपास ३०० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे ही वाचा..
पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक; ९६० लोकल फेऱ्यांवर होणार परिणाम
काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आरक्षणविरोधी
इस्रायल, हिजाबुल्ला आमनेसामने; एकमेकांवर डागली रॉकेट्स
महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणावरील हिंदुत्ववाद्याची व्यथा!
सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील पांचाळे गावामध्ये प्रवचन देत असताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यभरात मुस्लीम समुदायाने संताप व्यक्त केला होता. तर, रामगिरी महाराज यांच्यावर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि पुण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.