छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात एका पत्रकाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा पत्रकार तीन दिवसांपासून बेपत्ता होता आणि त्याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह हाती लागला. पत्रकार मुकेश यांनी बस्तरमधील १२० कोटी रुपयांच्या रस्ते बांधकाम प्रकल्पातील कथित घोटाळा समोर आणला होता. हा घोटाळा समोर आल्यानंतर सरकारने कंत्राटदाराच्या कारभाराची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुकेश यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून मुकेश यांचा चुलत भाऊ रितेश याला पोलिसांनी हत्येप्रकरणी अटक केली आहे.
छत्तीसगड येथे नुकताच १२० कोटींचा रस्ते बांधकामातील घोटाळा उघडकीस आणला गेला होता. हा घोटाळा उघड करणारा पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा ३ जानेवारी रोजी मृतदेह आढळून आला. एका सेप्टीक टँकमध्ये हा मृतदेह सापडला. मुकेश याचा चुलतभाऊ रितेश चंद्राकार याने मृतदेहाची ओळख पटवली होती. पण पोलिसांनी आता रितेश याच्यासह तिघांना याप्रकरणातील संशयीत म्हणून पकडले आहे.
बस्तर विभागातील गंगनूर ते हिरोली दरम्यान बांधल्या जात असलेल्या रस्ता कामामध्ये १२० कोटींचा घोटाळा झाला होता. हा घोटाळा पत्रकार मुकेश चंद्राकार यांनी बाहेर काढला होता. या रस्त्यासाठी ५० कोटीचे टेंडर मंजूर झाले होते. पण याच कामासाठी १२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले यासाठी टेंडरमध्ये कोणताही बदल केला गेला नाही. हा प्रकल्प ठेकेदार सुरेश चंद्राकर हाताळत होता.
हे ही वाचा..
भाजपाचे उद्या राज्यव्यापी विशेष सदस्य नोंदणी अभियान
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी
ग्रामीण भारत महोत्सव विकासयात्रेची झलक
वायुसेनेच्या तळावर इंडस्ट्री आउटलुक इव्हेंटचे आयोजन
पत्रकार मुकेश यांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर सरकारने चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे कॉन्ट्रक्टर लॉबीमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान, १ जानेवारी रोजी मुकेशचा चुलत भाऊ रितेश याने रस्ता बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर सुरेश चंद्राकार याच्याबरोबर मुकेश याची मिटींग ठेवली होती. त्या दिवसापासून मुकेश याचा मोबाईल बंद होता. मुकेश यांचा मोठा भाऊ युक्रेश चंद्राकर यांनी मुकेश यांचा फोन सतत बंद दाखवत असल्याने तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनच्या आधारे मुकेश हे कंत्राटदाराच्या आवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढे त्यांचा मृतदेहही हाती लागला. पोलिसांनी आता याप्रकरणी तीन संशयितांना पकडले आहे. यामध्ये रितेश आणि त्याच्या कुटूंबातील दिनेश चंद्राकार याचा समावेश आहे. या सर्व प्रकरणात सुरेश चंद्राकार हाच मुख्य सुत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे.