एका ८ वर्षांच्या मुलीचे अपहरण आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४२ वर्षीय पुरुषाला पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. ही शिक्षा सुनावताना एका विशेष POCSO न्यायालयाने काही निरीक्षणांची नोंद केलेली आहे. वैद्यकीय अहवालात असे दिसून आले की, यापूर्वीही संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते. परंतु याबाबत मात्र कुठलाही गुन्हा नोंदवला गेला नाही.
वैद्यकीय अहवालानुसार तिच्यावर याआधी झालेल्या अत्याचाराच्या खाणाखुणा सध्याच्या घडीला बरे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच रस्त्यावरील अशा कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. सध्याच्या घडीला मुंबईसह अनेक शहरांमध्ये निवारा नसल्यामुळे अनेक कुटुंबं केवळ फुटपाथच्या आश्रयाने जगत आहेत.
या अशा घटनांमधून न्यायालयाला आढळले की, फुटपाथवर झोपलेली मुले तसेच मुली अनेकदा लैंगिक शोषणाला बळी पडतात. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत यात शंका नाही, पण ते केवळ पुरावा म्हणूनच उपयोगी ठरतात. परंतु या फुटपाथवर राहणारे संरक्षणाविना असल्यानेच हे प्रकार वरचेवर होत असल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे.
हे ही वाचा:
अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे
उद्धव ठाकरे, भूमिपुत्रांना बाजूला करू नका!
न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूला अर्धांगवायूचा झटका
विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी तीन साक्षीदारांची पडताळणी केली. यामध्ये आई, मूल आणि एक पोलिस यांचा समावेश होता. न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेजवर पाहिल्यानंतर त्यामध्ये आरोपी मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे मुलीने मदतीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, फुटेजमध्ये असे कुठेही दिसून आले नाही. आरोपी यामध्ये कुठेही या मुलीच्या आईवडिलांना उठवताना दिसला नाही. त्यामुळेच सदर घडलेल्या गुन्ह्यामध्ये सीसीटीव्हीतील फुटेजवरच न्यायालयाने निकाल दिलेला आहे.