पनवेल जिल्हा सत्र न्यायालयाने कारागृह प्रशासनाला आरोपीने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मनिंदरसिंह बाजवा उर्फ जोरावर सिंह याला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
आरोपीने कारागृहातील कर्मचाऱ्यांनी आपली छळवणूक आणि मारहाण केल्याची तक्रार केली होती. न्यायालयाने बाजवाची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल २ सप्टेंबरपर्यंत न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले आहे.
बाजवा हा सध्या ठाणे कारागृहात आहे. अतिरिक्त सत्र न्या. आर. जी. अस्मार यांनी नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आरोपीची भेट घेऊन त्याची तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या कारागृहात हलवण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये युक्रेनच्या विमानाचे अपहरण
भारत अफगाणिस्तानचा खरा मित्र, पाकिस्तानकडून तालिबानला फूस
मला रत्नागिरीत का जाऊ दिले जात नाही?
राणेंच्या अटकेने काय पडसाद उमटतील, याचा विचार केलाय का?
बाजवाची वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्याला तळोजा येथील कारागृहात हलवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बाजवा याने २४ जुलैला त्याच्या औषधांची मागणी केली असता कारागृह अधिकारी वाघमारे यांनी औषधे देण्यास नकार दिला. २६ जुलैला ठाणे कारागृहाचे अधीक्षक अहिरराव यांनी बाजवाला मारहाणीची धमकी दिली आणि त्यांच्या आदेशावरून बाजवाला दोराने बांधून पट्ट्याने मारण्यात आले. त्यानंतर उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. कारागृह अधिकारी पठाण आणि कानसकर यांनी त्याच्याकडे दुसऱ्या कारागृहात हलवण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली, असे बाजवाने तक्रारीत म्हटले आहे.