गोरेगाव पश्चिम येथे एका दाम्पत्याचे मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीचा मृतदेह इमारतीच्या आवारात तर पत्नीचा मृतदेह घरातील बेडरूम मध्ये आढळून आला आहे. पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गोरेगाव पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
किशोर पेडणेकर (५६) आणि राजश्री पेडणेकर (५४) असे या मृत दाम्पत्याचे नाव आहे. किशोर आणि राजश्री हे दाम्पत्य गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या टोपीवाला सोसायटी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्यास होते. त्यांना एक मुलगा असून तो दिल्ली येथे राहतो. किशोर पेडणेकर हे फिटनेस संबंधी लागणाऱ्या साहित्याची विक्री करीत असे तर राजश्री या फिजोओथेरपिस्ट होत्या.
हे ही वाचा:
हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात पावसाचा प्रकोप; विविध घटनांमध्ये १६ लोकांचा मृत्यू
गांधी-वाड्रा परीवाराच्या धर्म-जातीबाबत लपवाछपवी का? |
बीजेडीच्या खासदाराचा काल राजीनामा, आज भाजपात प्रवेश !
वायनाडमधील आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेला धावून!
शुक्रवारी पहाटे इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बँकेच्या वॉचमनला काही तरी पडल्याचा आवाज आल्यामुळे त्याने इमारतीच्या आवारात जाऊन बघितले असता त्या ठिकाणी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. वॉचमनने तात्काळ पोलिसांना कळवले, गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदर व्यक्ती हा टोपीवाला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे किशोर पेडणेकर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकाचा शोध घेऊन त्यांना कळवले असता, त्यांनी किशोरच्या पत्नी राजश्री यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु कॉल उचलत नसल्यामुळे नातेवाईक घटनास्थळावर दाखल झाले.
दरम्यान पोलिसांना मृत किशोर यांच्या गळ्यातील साखळीमध्ये एक चावी मिळून आली, पोलिसांनी त्या चावीने पेडणेकर याचा फ्लॅट उघडून आता प्रवेश केला असता किशोर याच्या पत्नी राजश्री या बेडरूममध्ये मृत या अवस्थेत आढळून आल्या. राजश्री याच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा आढळून आल्या.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. किशोर हे मागील काही महिन्यांपासून ‘डिप्रेशन’ मध्ये होते. त्यांची औषधे सुरू होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. किशोर यांनी पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसानी व्यक्त केला असला तरी शवविच्छेदन अहवालानंतर उघडकीस येईल असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.