पोलिओग्रस्त वृद्ध दाम्पत्याला ६० लाखांना फसवले, २ लाख परत मिळाले!

बाकी रकमेसाठी पोलिस प्रयत्नशील

पोलिओग्रस्त वृद्ध दाम्पत्याला ६० लाखांना फसवले, २ लाख परत मिळाले!

मुंबई उपनगरमधील निवृत्त व्यवस्थापक त्यांच्या पत्नीसोबत वास्तव्यास असून, दोघे पती-पत्नी ९०-८५ % पोलिओ अपंग आहेत. त्यांची तब्बल ६० लाखांना ऑनलाइन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले. घरबसल्या जॉब देण्याच्या आमिषातून ही फसवणूक झालेली आहे. सायबर विभागाच्या वतीने त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आणि २ लाखांची रक्कम वसूल केली गेली. बाकी रकमेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

मे २०२४ मध्ये पतीच्या मोबाइलवर एक मेसेज आला होता. त्यातून पार्टटाइम जॉबची ऑफर देण्यात आली होती. सदर व्यवस्थापक हे निवृत्त असल्यामुळे त्यांनी या जॉबसाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. दिवसाला ५ हजार रुपये मिळतील असेही सांगण्यात आले. गुगलवर रेस्टॉरंटसाठी फाइव्ह स्टार रिव्ह्यू देण्याचे हे काम होते. त्यासाठी एक लिंक पाठविण्यात आली. त्यावर दिलेला टास्क पूर्ण करून त्याच्या प्रतिनिधीला बँक डिटेल्स देण्यास सांगितले. ते दिल्यावर काही दिवसांनी बँकेच्या खात्यात २१० रुपये जमा झाले. त्यानंतर आणखी एक टास्क देण्यात आला. त्यासाठी एक ग्रुप तयार करण्यात आला. त्यात २१ टास्क होते. त्यातील पहिले ३ टास्क पूर्ण केल्यावर ९० रुपये मिळाले. पुढे प्रत्येक टास्कवर पैसे भरण्यास सांगण्यात आले आणि १००० रुपये भरले तर त्यावर १४१० रुपये मिळतील असे आमिष दाखविण्यात आले.

 

तो टास्क पूर्ण केल्यावर १४१० रुपये जमा झाले. त्यानंतर मला ३००० रुपये भरण्यास सांगितले. ते भरल्यावर ४११० रुपये जमा झाले. पैसे जमा होत असल्यामुळे सदर तक्रारदाराला विश्वास बसला. त्यानंतर ७ हजार रुपये भरण्यास सांगितले. पण तेव्हा पैसे जमा झाले नाहीत. तरीही तक्रारदाराने प्रत्येक टास्कमागे पैसे भरणे सुरू ठेवले. १० हजार, २० हजार, ४० हजार, ५० हजार असे पैसे भरत राहिल्यानंतर एकूण ६० लाख ३४ हजारांची फसवणूक करण्यात आली. सदर प्रकरणात सायबर सेलकडे गुन्हा दाखल झाला झाला असून ह्या गुन्ह्यातील तपासकामात पोलिसांनी पहिल्या टप्प्यात काही रक्कम गोठवली.

हे ही वाचा:

कोलकाता हत्याप्रकरणी सीबीआयचा सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ममतांची बलात्कारविरोधी कायदा कठोर करण्याची मागणी

उद्धव ठाकरे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट’

पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई उच्च न्यायालयाचे वकील नितीन कांबळे यांनी संबंधित न्यायालयात अर्जाद्वारे सदरची गोठवण्यात आलेली रक्कम त्वरित पोलिओग्रस्त वृद्ध निवृत्त व्यवस्थापक असणाऱ्या पतीच्या बँक खात्यात समाविष्ट करण्याचे न्यायालयीन आदेश प्राप्त करून संबंधित पोलीस ठाण्यात कळवले आहे. सदरप्रकरणी पुढील तपास चालू असून लवकरचं संपूर्ण रक्कम मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या जवळपास २ लाख रुपये इतकी रक्कम मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर प्रकरणात FIR दाखल केला असून, माहिती तंत्रज्ञान अधिनियम व भारतीय न्याय संहिता कायद्यांप्रमाणे कलम लावण्यात आले आहेत. पूर्व विभाग सायबर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version