उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘ऍंटिलिया’ या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात ज्या एका पांढऱ्या इनोव्हा गाडीचा शोध सुरु होता, त्या इनोव्हा गाडीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातून ही पांढरी इनोव्हा गाडी ताब्यात घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या इनोव्हा गाडीचाही सचिन वाझे याच्याशी संबंध असल्याचे समोर येत आहे.
शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे याला एनआयए कडून अटक करण्यात आली. वाझे याच्या अटकेनंतरच पोलिसांना इनोव्हा गाडीचाही शोध लागला. ही इनोव्हा गाडी मुंबई पोलिसांच्या सीआययू पथकाच्या नियमित वापरतील गाडी होती अशी माहिती मिळत आहे. याच विशेष पथकाचे सचिन वाझे हे प्रमुख होते. पोलिसांनी शोधलेल्या या गाडीचा ताबा राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने मागितल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा:
मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा – आमदार अतुल भातखळकर
सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?
मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे सोबतच एका विधान परिषदेच्या आमदाराचेही नाव?
अंबानींच्या घराबाहेर सापडललेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीसोबतच एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडीसुद्धा आढळून आली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतही या इनोव्हा गाडीचा उल्लेख केला होता. या इनोव्हा गाडीचा प्रवासही मनसुख हिरेन यांच्या स्कॉर्पिओ गाडीच्याच रस्त्यावरून झाल्याचे फडणवीसांनी म्हटले होते. नंतर या इनोव्हाशी संबंधित सीसीटिव्ही चित्रणही समोर आले होते. काल रात्री पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.