कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याचा दावा; मुलीची हत्या ही ‘केरळ स्टोरी’ प्रमाणेचं!

विशिष्ट समाजातील आणि कुटुंबातील मुलींना लक्ष्य करण्याचा या गटाचा प्रयत्न – निरंजन हिरेमठ

कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याचा दावा; मुलीची हत्या ही ‘केरळ स्टोरी’ प्रमाणेचं!

कर्नाटकमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या २३ वर्षीय मुलीची फयाज नावाच्या तरुणाने हत्या केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. शिवाय पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी त्यांच्या मुलीच्या हत्येनंतर स्वत:च्या पक्षाला चांगलेच फटकारले आहे. शिवाय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवरही त्यांनी निशाणा साधला आहे. यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीची हत्या ही ‘केरळ स्टोरी’ प्रमाणे झाल्याचे म्हटले आहे.

कर्नाटकातील हुबळी येथे निरंजन हिरेमठ यांची कन्या नेहा हिरेमठच्या निर्घृण हत्येनंतर त्यांनी ‘टाईम्स नाऊ’शी बोलताना सांगितले की, “त्यांच्या मुलीची हत्या ही केवळ एक गुन्ह्याची घटना नसून तिला विशेषतः ‘केरळ स्टोरी’ सारखे लक्ष्य करण्यात आले होते. माफिया गट आहे जो विशिष्ट समाजातील आणि कुटुंबातील मुलींना लक्ष्य करण्यात गुंतलेला आहे.”

पुढे याचं मुलाखतीत निरंजन हिरेमठ यांनी सांगितले की, “नेहाने नकार दिल्यानंतर मारेकरी फयाजने तिचा पाठलाग सुरूच ठेवला होता. नेहाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत होते. कॉलेजमध्ये येण्याच्या वेळा, ती कोणत्या गेटमधून आत जायची, तिने कोणत्या क्लासेसला हजेरी लावली आणि तिने भेट दिलेल्या ठिकाणे हे सर्व तपशील जाणून घेण्यासाठी त्याने काही लोकांच्या गटाला याचे काम सोपवले होते.” निरंजन हिरेमठ यांनी सांगितले की, ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे काही विशिष्ट कुटुंबातील हुशार मुलींना लक्ष्य करणे आणि पद्धतशीरपणे त्यांचा पाठलाग करून त्यांना प्रेमप्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करणे हा एक विस्तृत कट आहे.

हिरेमठ यांनी सांगितले की त्यांनी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना सर्व सीसीटीव्ही फुटेज हे तपास अधिकाऱ्यांना आणि सीआयडीला देण्याची विनंती केली आहे. “या कारवाईत किती लोक सामील होते हे योग्य तपासातून समोर येईल. केरळ स्टोरी चित्रपटाप्रमाणे हे ऑपरेशन झाले आहे. अनेक वेळा नकार दिल्यानंतरही फयाज माझ्या मुलीच्या मागे येत राहिला. मी विशिष्ट समाजाला दोष देत नाही. परंतु हिंदू मुलींना टार्गेट करण्याचा आणि त्यांचा पाठलाग करण्याचा हा प्रकार बऱ्याच काळापासून सुरू आहे.” असं हिरेमठ यांनी स्पष्ट केले आहे.

“नेहाने फयाजला नेहमी टाळण्याचा प्रयत्न केला. कॉलेजचा एक माजी विद्यार्थी आपला पाठलाग करून त्रास देत असल्याचे तिने आईला सांगितले होते. मी आजूबाजूला विचारणा केली, चौकशी करण्याचा प्रयत्न केला आणि मला मिळालेल्या माहितीवरून मी खात्रीने सांगू शकतो की या गुन्ह्यात एका व्यक्तीचा हात नसून नेहा आणि नेहासारख्या इतर मुलींचा पाठलाग करून त्यांना पद्धतशीरपणे लक्ष्य करण्यात एक गट सामील होता,” असेही हिरेमठ म्हणाले.

“फयाजचे वडील, आई आणि बहीण या सर्वांनी मीडियाशी संवाद साधला आहे. ते सर्व यात सहभागी आहेत. त्याची बहीण जाणूनबुजून जुन्या कॉलेज फंक्शन्समधील फोटो निवडत आहे ज्यात नेहाने भाग घेतला होता. माझ्या मुलीची बदनामी करण्याच्या हेतूने ते व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप हिरेमठ यांनी केला आहे.

दरम्यान, निरंजन हिरेमठ यांनी सांगितले की, नेहाने फयाजचा प्रस्ताव नाकारला कारण तिला उच्च शिक्षणात रस होता आणि तिला धर्मांतर करायचे नव्हते. नेहा एमसीएचे शिक्षण घेत होती, तर फयाज कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडला होता. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात धार्मिक बाब नसल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे नेहाच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

मतदारांचा आशीर्वाद मोदीजींपर्यंत पोहोचवा

राजौरीत मशिदीच्या बाहेर दहशतवाद्यांचा गोळीबार; सैनिकाच्या भावाची गोळी झाडून हत्या!

ऍरिझोना येथील गाडी अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत चौथ्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश

नेहा हिरेमठ हिची १८ एप्रिल रोजी हुबळी येथील बी व्ही भूमरद्दी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये फयाज याने चाकूने भोसकून हत्या केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिचे मन वळवण्याचा सतत प्रयत्न करूनही तिने नातेसंबंधात येण्याच्या त्याच्या प्रयत्नांना नकार दिला होता. त्यामुळे चिडून त्याने नेहाची हत्या केली.

Exit mobile version