पंजाबमधील मोगा भागातील एका स्थानिक काँग्रेस नेत्याची दोन अज्ञातांनी त्याच्या घरातच गोळी झाडून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. हत्येनंतर कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्श दल्ला याने फेसबुक पोस्ट लिहून या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
या स्थानिक काँग्रेस नेत्याचे नाव बलजिंदर सिंग बाल्ली असे आहे. ते सोमवारी त्यांच्या घरात असताना अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. दाला गावातील बाली यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे. बाल्ली हे अजितवाल येथील काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष होते. या हत्येनंतर काही तासांतच खलिस्तानी दहशतवादी अर्श दल्ला याने फेसबुक पोस्ट लिहून या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
हे ही वाचा:
खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येसंदर्भात कॅनडाने केलेल्या वक्तव्याचा भारताने केला धिक्कार
जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ असे नामकरण करण्याची सूचना
तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !
खर्गेचे G2 आणि गोयल म्हणाले 2G, One G, son G !
बलजिंदर सिंग बाल्ली याने त्याचे भविष्य धुळीत मिळवले आणि त्याला गुंडगिरीमध्ये लोटले, असा आरोप त्याने या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. तसेच, बदला घेण्यासाठी त्याने त्याच्या आईला पोलिस कोठडीत टाकले, असाही दावा त्याने केला.
अर्श दल्ला याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीमध्ये असून राष्ट्रीय तपास संस्थाही (एनआयए) त्याच्या मागावर आहे. तो गेल्या तीन ते चार वर्षांपासून कॅनडामधून सूत्रे हलवत असून पंजाबमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
बलजिंदर सिंग बाल्ली हे घरात केस कापत असताना त्यांना एका अज्ञाताचा फोन आला. या अज्ञाताने त्यांना काही कागदपत्रांवर तुमची स्वाक्षरी हवी असल्याची विनंती केली. बाल्ली यांना हे नेहमीचे सोपस्कार आहेत, असे वाटल्याने ते त्या अज्ञाताला भेटण्यासाठी बाहेर गेले. तेव्हाच मोटारसायकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार करून घटनास्थळावरून पलायन केले. हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या बाल्ली यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक पोलिस सतर्क झाले असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.