‘पवार’ नावाच्या व्यक्तीची तक्रारच नाही, मग चितळेची चौकशी कशाला?

‘पवार’ नावाच्या व्यक्तीची तक्रारच नाही, मग चितळेची चौकशी कशाला?

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या केतकी चितळे प्रकरणात ज्या पवार व्यक्तीचा उल्लेख तिने शेअर केलेल्या कवितेत आहे, त्या ‘पवार’ याव्यक्तीने तक्रारच केलेली नाही मग चितळेवर विविध प्रकारचे गुन्हे आणि तिचा रिमांड ही कारवाई कशी काय होऊ शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यशस लिगलच्या वतीने योगेश देशपांडे यांनी प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल करून या संपूर्ण प्रकरणातील फोलपणा दाखविला आहे.

देशपांडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, जी कलमे चितळेविरोधात लावण्यात आली आहेत, त्यात कोठडी मिळत नाही तरीही तीन दिवसांचे रिमांड दिले. गोरेगाव पोलिस स्टेशनमधूनही रिमांड देण्यात आले आहे. शिवाय, ठाणे आणि कळवा पोलिस स्टेशननमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये कलम ६६ए लावण्यात आले आहे, जे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या कलमानुसार ऑनलाइन भाष्य करण्यास मनाई करण्यात येते.

त्या आधारावर देशपांडे यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे की, जर सदर कवितेत ‘पवार’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे तर त्या व्यक्तीने तक्रार करायला हवी. पण ही तक्रार केली आहे, स्वप्निल नेटकेने. ज्याच्याविरुद्ध बदनामी झाली आहे त्याने तक्रार करायला हवी. त्रयस्थ व्यक्ती तक्रार करू शकत नाही, असे देशपांडे यांनी ‘न्यूज डंका’शी बोलताना सांगितले.

देशपांडे म्हणतात की, तरीही कोर्टाकडून चितळेला कोठडी दिलेली आहे. अजूनही रिमांड मागण्यात येत आहे. पिंपरी, देहूरोड वगैरे ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. एकाच गुन्ह्याकरिता सहा ठिकाणी गुन्हे. ही झुंडशाही झाली. मग असा हा पायंडाच पडेल. सरकार आहे म्हणून १० ठिकाणी गुन्हा दाखल करत आहात. खरे तर एखाद्या गुन्ह्यातून काही सत्य बाहेर काढायचे असेल तर रिमांड घेतली जाते. पण तिने आधीच सांगितले की, मी पोस्ट केली आहे. तिच्या वस्तूही यासंदर्भात ताब्यात घेतल्या. मग इतर पोलिस स्टेशननी का गुन्हे दाखल केले?

सदर पोस्टची ती लेखकही नाही. ती पोस्ट फक्त तिने फॉरवर्ड केली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया सुरू आहे ती पाहता व्हिजिलन्सकडे न्यायाधीशांचीही तक्रार करण्यात आली आहे. जर या प्रकरणात चुकीचे घडल्याचे दिसत असेल तर स्वप्निल नेटकेची तक्रार दाखल करून घेता तरी कशी, असे देशपांडे म्हणतात.

केतकी चितळेने न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर स्वतःसाठी कोणत्याही वकिलाला नियुक्त न करताच स्पष्ट केले की, तिने ही पोस्ट शेअर केलेली आहे आणि फेसबुकवरील ही पोस्ट आपण डीलिट करणार नाही. यासंदर्भात तिच्यावर जे एफआयआर करण्यात आले. त्यातील ठाणे व कळवा पोलिस स्टेशनने दाखल केलेले एफआयआर हे प्रतिज्ञापत्र सादर करेपर्यंत ऑनलाइन दिसले नाहीत.

ही कविता वाचल्यावर तिथे ५०५ (२) हे कलम कसे काय लावण्यात आले, हा प्रश्न आहे. १५३ ए हे कलमही का लावण्यात आले? ही कविता पवार या व्यक्तीसंदर्भात लिहिण्यात आलेली असताना स्वप्निल नेटके या व्यक्तीने तक्रार करण्याचे कारण काय, असा सवाल या प्रतिज्ञापत्रात उपस्थित करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

रशियाचा मोठा विजय, मारियुपोलवर ताबा

संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक

शिवराज सरकारने टिकवले ओबीसी आरक्षण

पहिल्यांदा तक्रार करू…पण कारवाई झाली नाही तर सोडणार नाही

 

केतकी चितळेविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल करताना आणि तिचा रिमांड मागताना तिला लक्ष्य करण्याचा हेतू दिसतो. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण तयार करणे की पवार नावाच्या व्यक्तीविरोधात कुणीही काही बोलले तर त्याविरोधात कारवाई केली जाईल, असेही प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.

देशपांडे यांनी असेही म्हटले आहे, या मागे कुणीतरी अदृश्य शक्ती कार्यरत आहे. ज्यांनी कायदा धाब्यावर बसवला आहे.

त्यासाठीच या अदृश्य शक्तीसोबत हातमिळवणी करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी. न्यायपालिकेलाही यासाठी जबाबदार धरावे. त्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या ऑफिस ऑफ रजिस्ट्रारकडून याची चौकशी व्हावी. शिवाय, उच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या कृतीची दखल घ्यावी. एकाच गुन्ह्यामध्यें वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मघ्ये वेगवेगळे FIR दाखल करुन दहशत माजविण्याचा हा प्रकार आहे. पोलिस यांतरण ना हाताशी धरून हा प्रकार महाराष्ट्रत चालू आहे. हे खरोखर भयानक आहे, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version