पोर्नोग्राफी मध्ये अटकेत असलेल्या राज कुंद्राची सासू आणि शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी आता जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज कुंद्रा प्रकरणावरून सध्या शिल्पा शेट्टी कुटुंबीय चर्चेत आहे. आता शिल्पा शेट्टीच्या आईने ही तक्रार केल्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.
सुनंदा शेट्टी यांनी एक कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर घारे असे शेतकऱ्याचे नाव आहे.
सुनंदा शेट्टी यांनी २०१९ ते २०२० मध्ये रायगड जिल्हयातील कर्जत येथे एका जमिनीचा व्यवहार केला होता, हा व्यवहार सुधाकर घारे याच्यासोबत झाला होता. सुधाकर घारे याने जमीन आणि बंगला स्वतःच्या नावावर असल्याचे सांगून खोटे कागदपत्रे तयार करून सुनंदा यांच्याकडून एक कोटी ६० लाख घेतले होते. बंगला आणि जमिनीचे बोगस कागदपत्रे असल्याचे लक्षात आल्यानंतर सुनंदा यांनी घारे यांच्याकडे पैसे परत मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. अखेर सुनंदा यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून जुहू पोलिसांनी सुधाकर घारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राज कुंद्राच्या अडचणीत वाढ
दरम्यान, पोर्नोग्राफी प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा एका मॉडेल ने केला आहे. या गुन्हयात प्रत्यक्षात राज कुंद्रा याचे नाव घेतले गेले नसले तरी कुंद्रा याच्या कंपनीचे नाव एफआयआरमध्ये देण्यात आले आहे. नवीन गुन्ह्यामुळे राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मालवणी पोलिसानी हा गुन्हा पुढील तपासासाठी प्रॉपर्टी सेल कडे वर्ग केला आहे.
राज कुंद्रा याला मंगळवारी न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यानंतर त्याचा जामिनासाठी प्रयत्न सुरू असताना मंगळवारी रात्री एका मॉडेलने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे या मॉडेलने दिलेल्या तक्रारीत राज कुंद्रा याचे थेट नाव घेतलेले नसले तरी हॉटशॉट निर्मात्याचा आणि अभिनेत्री वंदना तिवारी उर्फ गेहना वशिष्ठ हिचा उल्लेख केला आहे. हॉटशॉटच्या चार निर्मात्याचा एफआयआर मध्ये उल्लेख करण्यात आलेला असून या चार निर्मात्यामध्ये अभिजित हरीचंद्र, अजय श्रीमत, प्रिन्स कश्यप आणि वंदना तिवारी उर्फ गेहना वशिष्ठ अशी नावे आहेत.