शिवसेना (उबाठा) गटाचे माजी नगरसेवक आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेकडून सुधीर मोरे यांना मानसिक त्रास दिला जात होता अशी तक्रार मोरे यांच्या मुलाने दिली असून मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर मोरे हे पूर्व उपनगरातील विक्रोळी पश्चिम पार्कसाईड येथे राहण्यास होते. शिवसेना उबाठा गटाचे सुधीर मोरे (६२) हे माजी नगरसेवक आणि रत्नागिरि जिल्हा संपर्क होते. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घाटकोपर विद्याविहार दरम्यान हवेली पुलाखाली रेल्वे रुळावर मोरे यांचा मृतदेह कुर्ला रेल्वे पोलिसांना मिळून आला होता. शुक्रवारी दुपारी सुधीर मोरे यांच्या मुलगा समर (२७) याने कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा:
‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते जलावतरण
महायुतीच्या त्रिशुळाने विरोधकांना घेतले धारेवर
पहाड खोदून लोगो सुद्धा काढता आला नाही हो यांना…
‘इंडिया’ची बैठक समाप्त; अजूनही लोगोवर एकमत नाही
ही महिला विक्रोळीत राहणारी असून एका मोठ्या पदावर असल्याचे कळते. सुधीर मोरे यांचे मागील सात आठ वर्षांपासून तिच्या सोबत मैत्रीपूर्ण सबंध होते. मोरे यांचा मुलगा या महिलेला मागील काही महिन्यां पासून ओळखत होता. या महिलेचा फोन आल्यानंतर सुधीर मोरे तणावात येत असत, अशी माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ती महिला मोरे यांना धमकी देऊन मानसिक त्रास देत होती असे समर याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सुधीर मोरे यांच्या तक्रारीवरून या महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.
गुरुवारी रात्री सुधीर मोरे यांनी पार्कसाईड येथील गणेश मंडळाची बैठक आटोपल्यानंतर ते थेट पार्कसाईड येथून रिक्षाने घाटकोपर रेल्वे स्थानकात आले. तेथून रेल्वे पादचारी पूला वरून फलाट क्रमांक २ वर आले. तेथून ते सीएसएमटीच्या दिशेने रुळावरून चालत हवेली उड्डाण पुलापर्यत आल्याचे घाटकोपर रेल्वे स्थानकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येत असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दूल यांनी दिली.