कोलकाता येथे आर्ट गॅलरी असल्याचे सांगत पेंटीग आणि शिल्प देण्याचे आमीष दाखवून बाप-लेकाने ग्रँटरोडमधील व्यवसायिकाला बनावट शिल्पे विक्रीकरुन २२.२० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन डॉ. दा. भ. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
ग्रँटरोड येथील रहिवासी असलेल्या ५८ वर्षीय फिर्यादी यांचा लॅमिंग्टन रोड येथे पेटींग आणि शिल्प खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय असून सध्या ते ताडदेवमध्ये राहातात. १ मे २०२२ रोजी त्यांना प्रकाश केजरीवाल नावाच्या व्यक्तीने कॉल करत त्याची कोलकाता येथे आर्ट गॅलरी असल्याचे सांगत पेंटीग आणि शिल्प देण्याचे आमीष दाखविले. तीन दिवसांनी त्याने फिर्यादी यांना काही पेंटीग आणि शिल्पांचे फोटो पाठवले.
फिर्यादी यांना यातील एक शिल्प आवडले. फिर्यादी यांनी शिल्प बघण्यासाठी ११ मे २०२२ ला कोलकाता गाठले. त्यांना प्रकाश आणि त्यांचा मुलगा प्रभास भेटले. दोघांनी त्यांना जुनी शिल्पे आणि इतिहासाची प्रमाणपत्रे दाखवली. एका शिल्पाची किंमत त्यांनी ११ लाख रुपये सांगितली. फिर्यादी यांनी शिल्प खरेदी करण्यासाठी प्रकाश आणि प्रभास यांना रोखीने साडेपाच लाख रुपये दिले.
हे ही वाचा:
गृहमंत्री अमित शहांच्या सुरक्षेत कुचराई, दोन तरुणांनी केला ताफ्याचा पाठलाग !
विशाळगड हिंसाचाराशी संबंधित वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी एकाला अटक
विकास प्रकल्प रद्द करणे हीच उद्धव ठाकरेंची खासियत !
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील २४ जवानांचा समावेश
शिल्पसोबत घेऊन फिर्यादी हे मुंबईत परतले. त्यानंतर, त्यांनी उरलेली रक्कम प्रकाश आणि प्रभास यांना पाठवली. १९ मे ला फिर्यादी यांनी त्यांच्याकडून ११ लाख रुपयांना आणखी एक शिल्प खरेदी केले. दोन्ही शिल्प फिर्यादी यांनी आपल्या कार्यालयात ठेवली. फिर्यादी यांनी जुलै २०२२ मध्ये दोन्ही शिल्पे विक्रीसाठी काढली असता त्यांना ही शिल्पे बनावट असल्याचे समजले.
फिर्यादी यांनी प्रकाश आणि प्रभास यांना शिल्पे बनावट असल्याचे सांगत पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र दोघांनीही त्यांना उडवाउडावीची उत्तरे देत धमकावण्यास सुरुवात केली. अखेर, आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने फिर्यादी यांनी डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.