कॉमेडियन सुनील पाल यांचे अपहरण करून ८ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी मेरठ पोलीसाकडे वर्ग करण्यात आला आहे. अपहरणकर्त्यानी सुनील पाल यांचे हरिद्वार येथील एका ढाब्या मधून अपहरण करून एका अज्ञात खोलीत डांबून सुटकेसाठी २० लाख रुपयांची खंडणी मागीतली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
कॉमेडियन सुनील पाल हे २ डिसेंबर रोजी हरिद्वार येथे एका शोसाठी गेले होते, त्या नंतर त्यांचा कुटूंबियांशी संपर्क तुटला, आणि ३डिसेंबर रोजी अचानक पाल यांची पत्नी, नातेवाईक आणि मित्रमंडळींना व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवून पैशांची मागणी करण्यात आली होती. मात्र सुनील पाल यांचा संपर्क होत नसल्यामुळे घाबरलेल्या पत्नीने सांताक्रूझ पोलीस ठाणे गाठले होते. सुनील पाल बेपत्ता असून त्याच्या त्यांच्या व्हाट्सअप्प वरून पैशांची मागणी केली जात असल्याचे पाल यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.
सांताक्रूझ पोलिसांनी पाल यांचे शेवटचे लोकेशन शोधून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, रात्री उशिरा सुनील पाल यांचा सांताक्रूझ पोलीसासोबत संपर्क झाला, मी दिल्ली विमानतळावर असून मुंबईकडे येत आहे, आल्यावर सर्व सांगतो असे सुनील पाल यांनी पोलिसांना सांगितले होते. सांताक्रूझ पोलिसांनी शुक्रवारी सुनील पाल यांचा जबाब नोंदवला असता त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, हरिद्वारमध्ये एक शो बुक करण्यात आला होता.
हे ही वाचा:
‘जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्या’ला फडणवीसांनी का केला फोन?
कुर्ल्यात बेस्ट बसची अनेकांना धडक; ६ जणांचा मृत्यू
शक्तीकांत दास निवृत्त होणार, हे आहेत रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर!
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘विमा सखी योजने’चे उद्घाटन!
२ डिसेंबर रोजी सुनील पाल हे मुंबईतून विमानाने हरिद्वारला पोहोचले, तेव्हा त्यांना घ्यायला आलेल्या गाडीने पाल यांना एका ढाब्याजवळ सोडले आणि तिथे पुन्हा दुसरी गाडी आली आणि त्यांना जबरदस्तीने त्या गाडीत बसवले. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती, तेथून दीड वाहनातून एका अज्ञात स्थळी एका खोलीत नेण्यात आले आणि अपहरणकर्त्यानी पाल यांच्या डोळ्यावरील पट्टी उघडली,तेव्हा अपहरण कर्त्यानी आम्ही किडनॅपर आहोत,असे म्हटले, त्यांनी सुटकेसाठी २० लाख रुपयांची मागणी केली, अन्यथा जीवे मारून नदीत फेकू अशी धमकी अपहरणकर्त्यानी दिली अशी माहिती पाल यांनी पोलिसांना दिली.
जीव वाचवण्यासाठी पाल यांनी त्यांना माझ्याकडे एवढी रक्कम नाही, माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मी नातेवाईक आणि मित्रमंडळी कडून मागवून देतो असे अपहरणकर्त्याना पाल यांनी सांगितल्यावर अपहरण कर्त्यानी पाल यांना त्यांचा मोबाईल फोन परत करून रक्कम मागविण्यास सांगितली.सुनील पाल यांनी पत्नी, नातेवाईक आणि मित्राना व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवून खात्यावर पैसे मागविले आणि ८ लाख रुपये अपहरण कर्त्याना देऊन स्वतःची सुटका करून घेतली असे पाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
अपहरण कर्त्याना रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी पाल यांना मेरठच्या रस्त्यावर सोडले. तिथून त्यांनी गाझियाबादला एक रिक्षा घेतली आणि मग तिथून दिल्लीच्या काश्मिरी गेटला पोहोचले, तेथून दुसरी रिक्षा घेऊन दिल्ली विमानतळावर गाठले आणि मुंबईला आलो अशी माहिती सुनील पाल यांनी सांताक्रूझ पोलिसांना दिली. हा सर्व प्रकार हरिद्वार मेरठ येथे घडल्यामुळे सांताक्रूझ पोलिसांनी शून्य एफआयआर नोंदवून अनोळखी अपहरणकर्ता विरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी मेरठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.