वर्दळीच्या रस्त्यावर दुचाकीवर बसून धूम्रपान करत असलेल्या दोघा भावांना हॉर्न वाजवून हटकल्यामुळे त्या दोघांनी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. बीकॉमचा विद्यार्थी असणारा हा युवक त्याची सत्र परीक्षा देण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. मारहाणीत जखमी झाल्यामुळे या युवकाच्या दोन परीक्षा चुकल्या आहेत.
संजयनगर भागात राहणाऱ्या एम. सतीश यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांचा मुलगा प्रज्वल एस. याला शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मारहाण झाली. पोलिसांनी या प्रकरणी भूपासांद्रा येथे राहणारे २० वर्षांचे असादुल्ला खान आणि मसाईबुल्ला खान यांना अटक केली आहे.
ब्रिगेड रोड येथील सेंट जोसेफ कॉलेजचा विद्यार्थी असणारा प्रज्वल हा त्याच्या वडिलांच्या गाडीतून कॉलेज कॅम्पसला जात होता. तो भूपसांद्रा मुख्य रस्ता येथे पोहोचला असताना त्याला दिसले की, दुचाकींवर बसलेल्या दोघांनी रस्ता अडवला असून ते त्यावरच बसून धूम्रपान करत आहेत. बीएमटीसीच्या बसगाड्या आणि अन्य मोठ्या गाड्या या रस्त्याच्या डाव्या बाजूने जात होत्या. त्यामुळे प्रज्वल उजवीकडून गेला. त्याला वळण घ्यायचे होते. मात्र त्याला दिसले की, दोघा जणांनी रस्ता अडवला आहे. त्याने या दोघांना रस्ता मोकळा करण्यासाठी हॉर्न वाजवला. मात्र या दोघांनी उर्मटपणे आम्ही आताच सिगारेट शिलगावली असून ती संपेपर्यंत थांबण्यास सांगितले.
हे ही वाचा:
होमस्टेमधील एका महिला कर्मचाऱ्याला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार!
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आठ संघ झाले पात्र
हैदराबाद येथील एका निवासी इमारतीला आग, ९ जणांचा मृत्यू!
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट
मात्र प्रज्वलला कॉलेजला जाण्यास उशीर होत असल्याने त्याने पुन्हा हॉर्न वाजवला. त्यामुळे संतापलेल्या या दोघांनी प्रज्वलकडे धाव घेऊन त्याला शिविगाळ केली आणि गाडीच्या काचेवर मारले. त्यानंतर त्यांनी प्रज्वलच्या चेहऱ्यावर मारून आणि त्याला गाडीबाहेर खेचले. त्याने प्रज्वलला रस्त्यावर पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचे धूम्रपान संपेपर्यंत त्याने थांबायला हवे होते, असे ते त्याला म्हणत होते. प्रज्वल याला नाकावर मोठी जखम झाली आहे. तसेच या मारहाणीत प्रज्ज्वलचे तीन दातही तुटले आहेत.
दोघांनी गाडीचेही अतोनात नुकसान केले. येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी रस्ता मोकळा केला. मात्र हल्लेखोर आणि त्यांच्या सहा मित्रांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. प्रज्वल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या दोन मारहाण करणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.