बीएच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने एका मुलीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याची घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये उघडकीस आली आहे. बीएच्या पहिल्या वर्षात शिकणारी ही मुलगी वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाली होती. त्यामुळे तिने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून इंदूर येथून उज्जैनला पलायन केले होते. मात्र या मुलीला शनिवारी पोलिसांनी उज्जैन येथून ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्सच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी शुक्रवारी दाखल केली होती. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच ती कॉलेजमधून परत येत असताना मंदिराजवळून तिचे अपहरण झाल्याचे तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले होते, असे बाणगंगा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सोनी यांनी सांगितले.
त्यांच्या मुलीने एका अनोळखी नंबरवरून फोन करून तिचे अपहरण झाल्याचे वडिलांना सांगितले होते. तिच्या एका शिक्षकाने देवळाजवळील चौकात सोडल्यानंतर तिने ई-रिक्षा पकडली. मात्र रिक्षाचालकाने तिला अज्ञात स्थळी नेले आणि तिच्या तोंडावर कापड ठेवून तिला बेशुद्ध केले, असे तिने वडिलांना सांगितले. मात्र या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, तिने केलेला दावा खोटा ठरला.
हे ही वाचा:
कर्नाटकमधील काँग्रेस विजयाच्या व्यूहरचनेचा हा शिल्पकार
कर्नाटकात उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे मुस्लिमांना द्या
जयंत पाटलांना ईडीकडून दुसरं समन्स
आता ९२८ संरक्षण उत्पादनांची निर्मिती होणार भारतात
या दरम्यान ही मुलगी उज्जैनमधील हॉटेलमध्ये एकटीच बसली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीतील छायाचित्राशी या मुलीचे छायाचित्र जुळले आणि पोलिस उज्जैनला पोहोचले. पोलिसांनी तिला इंदूरला आणून तिच्या बॅगेची तपासणी केली. त्यामध्ये इंदूर-उज्जैन बसचे तिकीट आणि उज्जैन येथील रेस्टॉरंटचे बिलही आढळले. महिला पोलिसांनी तिचे समुपदेशन केले असून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.