“बदलापूर अत्याचार प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही”

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

“बदलापूर अत्याचार प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही”

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बदलापूर पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेतील साधारण चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकारानंतर स्थानिक प्रचंड संतापले आहेत. त्यांनी बदलापूर बंदाची हाक दिली असून अनेक नागरिकांनी आणि पालकांनी शाळेच्या परिसरात जाऊन या घटनेचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. तर आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय रेल्वे प्रवाशांनी बदलापूर स्थानकात रेल रोको केला असून यामुळे मुंबईकडे जाणारी आणि कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून कारवाईचे आश्वासन दिले आहे.

“बदलापूरमध्ये झालेली घटना ही अत्यंत घृणास्पद आहे. ज्या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केलं आहे, त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन तत्काळ दोषींवर कारवाई करावी. तसेच अशाप्रकारच्या घटना यापुढे होऊ नये, म्हणून संस्था चालक, शाळा या सर्व लोकांवर एक नियमावली तयार केली जाईल, जेणेकरुन असे कृत्य यापुढे होणार नाही,” असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

“याबद्दल पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले असून पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्या आरोपीवर कलमे तात्काळ लागू करून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावे. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

या प्रकरणात संस्था चालक किंवा जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केलं आहे, त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी. संस्था चालकांना काही नियम लागू करण्यात येणार आहेत. कोणतीही संस्था एखाद्या कर्मचाऱ्याला कामावर ठेवताना तो कर्मचारी नेमका कोण, कोणत्या ठिकाणावरुन आला आहे, त्याची पार्श्वभूमी काय यासाठी एक नियमावली तयार करणार. यात जे कोणी दोषी असतील, त्या सर्वांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला आहे.

हे ही वाचा :

लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर; बदलापूर बंदची दिली हाक

चांदीवलीत कट्टरपंथीकडून तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार !

लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?

ममता बॅनर्जींची ठोकशाही, विरोधात पोस्ट करणाऱ्या विद्यार्थीनीला अटक !

प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्र्यांकडून आदेश

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. “बदलापूर येथील घृणास्पद घटनेत दोन तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Exit mobile version