महादेव बेटिंग ऍप प्रकरणातील कारवाई संदर्भात नवी माहिती समोर आली आहे. महादेव ऍपचा एक संचालक आणि सौरभ चंद्राकरचा निकटवर्तीय सहकारी मृगांक मिश्रा याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. महादेव बेटिंग ऍप प्रकरणी त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती.
मृगांक मिश्रा हा गेल्या दोन वर्षांपासून दुबईत राहत होता. १४ ऑक्टोबर रोजी तो दुबईहून मुंबईत परतल्यावर मुंबई पोलिसांच्या मदतीने राजस्थान पोलिसांनी त्याला अटक केली. २१ ऑक्टोबरपर्यंत तो राजस्थान पोलिसांच्या कोठडीत असणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा हा मूळचा मध्य प्रदेशातील रतलामचा रहिवासी आहे. मुंबईतील कांदिवलीमधील लोखंडवाला येथे असलेल्या ऑक्ट्रा क्रेस्ट अपार्टमेंटमध्ये त्याच्या नावे मालमत्ता आहे. केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच त्याच्या फ्लॅटची झडती घेतली आणि अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. संस्थेतील फार कमी लोकांना त्याचे सौरभ चंद्राकर यांच्याशी असलेले जवळचे संबंध माहीत होते, असे तपासादरम्यान समोर आले आहे.
राजस्थान पोलिसांच्या तपासानुसार, मिश्राने महादेव ऍपच्या बेटिंग व्यवहारांसाठी १ हजार ६०० हून अधिक खाती उघडली होती. सुरुवातीला, त्यांना फक्त ९० बनावट बँक खात्यांची माहिती मिळाली. ज्यामध्ये ६८ खात्यांचे एकूण २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार होते. या बनवाट खात्यांचा वापर सट्ट्याच्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिश्रा याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान आणि इतर अनेक राज्यांतील स्थानिक सिंडिकेटच्या मदतीने कमी गुंतवणुकीत कामे पूर्ण केली. भाजी विक्रेते, दुकानदार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांसह सामान्यत: कमी उत्पन्न असलेल्या वर्गातील व्यक्तींना त्याने टार्गेट केले.
हे ही वाचा:
नीरज चोप्राचे जागतिक ऍथलेटिक्स संघटनेकडून कौतुक!
मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा पोलिसांना फोन!
पॅलेस्टाइनवरून तस्लिमा नसरिन यांनी बांगलादेशवासियांना सुनावले
रोहित शर्माने सांगितले, अंपायरला दंड दाखविण्याचे कारण
या संदर्भात ईडीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावलं आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासही सांगितले आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीमध्ये ईडीने ४१७ कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा ईडीला संशय होता. याप्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत ईडीने चौकशी सुरु केली आहे.