अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा सराईत गुंड शाम तांबे उर्फ सॅव्हीओ रॉड्रिक्स याला मुंबई गुन्हे शाखेने वरळी येथून अटक केली आहे. शाम तांबे याच्याकडून गुन्हे शाखेने एक गावठी पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. खून,खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, खंडणी या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तांबेला न्यायालयाने २९ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरात गुन्हेगारी टोळ्या व त्यांच्या गुंडावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून बेकायदेशीर शस्त्र वापरणारे, व त्यांची विक्री करणाऱ्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या कारवाई दरम्यान मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ चे प्रपोनि. दीपक सुर्वे यांच्या पथकाला गुप्त माहितीदाराने अशी माहिती मिळाली की, कुख्यात गँगस्टर छोटा राजन टोळीचा एक सराईत गुंड शाम तांबे हा गंभीर गुन्हा करण्याच्या हेतूने वरळीतील जिजामाता नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) दत्ता नलावडे, सपोआ.चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ३ चे प्रपोनि.दीपक सुर्वे,पोनि. शामराव पाटील, सपोनि. समीर मुजावर, अंमलदार.आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, भास्कर गायकवाड आणि शिवाजी जाधव या पथकाने सोमवारी वरळी जिजामाता नगर, हॉटेल कृष्णा येथे सापळा लावला.
छोटा राजन टोळीचा शार्प शुटर शाम तांबे उर्फ सॅव्हीओ रोड्रिंक्स हा त्या ठिकाणी गुन्ह्याच्या हेतूने येताच पोलिस पथकाने त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेऊन युनिट ३च्या कार्यालयात आणून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे एक पिस्तुल, ३ जिवंत राऊंड (काडतुसे) मिळून आली.
हे ही वाचा:
साडी चोळीसाठी चिमुरडीची हत्या, तृतीयपंथीला फाशीची शिक्षा
संदेशखाली गाव जमिनी हडपणे, अनन्वित छळाच्या घटनांचे साक्षीदार
कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी कारागृहातील बॅरेक वाढवणार
डाव्यांना केरळमधून कॉंग्रेसची हकालपट्टी करायची आहे
शाम तांबे उर्फ सॅव्हीओ रॉड्रिक्स याच्याविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा डाक करून त्याला अटक करण्यात आली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाम तांबे उर्फ़ सॅव्हीओ हा छोटा राजन टोळीचा एकेकाळचा शार्प शूटर असून त्याच्या विरुद्ध दक्षिण मुंबईत खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, दरोडा या सारखे अनेक गुन्हे दाखल असून दोन वेळा मुंबई पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील केली होती.
अनेक वर्षे तुरुंगात असणारा शाम तांबे हा सध्या जामिनावर बाहेर आला होता.वरळी येथे आपल्या कुटूंबासोबत राहत होता. त्याच्याकडे सापडलेल्या पिस्तुलावरून तो गंभीर गुन्हा करण्याच्या प्रयत्नात होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.मंगळवारी त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २९ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.