मणिपूरमधून १३ हजार नागरिकांची सुटका

मणिपूरमधील हिंसाचारामुळे राज्याची दुरवस्था झाली आहे. संतप्त आंदोलकांनी गुरुवारी अनेक भागांतील घरे, शाळा, चर्च आणि वाहनांसह अनेक मालमत्ता पेटवून दिल्या

मणिपूरमधून १३ हजार नागरिकांची सुटका

मणिपूरमधील हिंसाचार निवळला असला तरी परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्यामुळे हिंसाचार नियंत्रणात आला आहे. लष्कराने आतापर्यंत १३ हजार नागरिकांची सुटका केली आहे.

 

मणिपूरमधील हिंसाचारामुळे राज्याची दुरवस्था झाली आहे. संतप्त आंदोलकांनी गुरुवारी अनेक भागांतील घरे, शाळा, चर्च आणि वाहनांसह अनेक मालमत्ता पेटवून दिल्या होत्या. ३ मे रोजी ‘ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर’ (एटीएसयूएम)ने काढलेल्या मोर्चानंतर राज्यात अराजकता माजली होती. चुरचंदपूरच्या तोरबुंग भागात ६० हजारांहून अधिक जण रॅलीत सहभागी झाल्याचा अंदाज आहे.

 

कांगपोकपी जिल्ह्यातील सायकुलमध्ये जवळपास ११ नागरिक जखमी झाल्याची नोंद झाली आहे, तर इतर दोघांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत, आरएएफ, सीआरपीएफ आणि बीएसएफसह निमलष्करी दलाच्या १४ कंपन्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय वायुसेनेने मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांतील सुटका करण्यासाठी आसामच्या हवाई तळावरून सी १७ ग्लोबमास्टर आणि एन ३२ विमानांचा वापर केला.

हे ही वाचा:

यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !

विमानात चढला तात्या ‘विंचू’; महिलेला केले बेशुद्ध

डीआरडीओच्या ‘त्या’ शास्त्रज्ञाने हनी ट्रॅपमध्ये पैशाचा व्यवहार केला होता का?

सावध राहा! बंगालच्या उपसागरात ”चक्रीवादळ मोचा” !

आतापर्यंत सुमारे १३ हजार नागरिकांना वाचवण्यात ते यशस्वी झाले आहेत, असे लष्कराने जाहीर केले. चुराचंदपूर, कांगपोकपी, मोरे आणि ककचिंग हे भाग आता नियंत्रणात आहेत आणि गुरुवारी रात्रीपासून येथे कोणत्याही मोठ्या हिंसाचाराची नोंद झालेली नाही.

 

जाळपोळ आणि रस्ता अडवण्याच्या तुरळक घटनांव्यतिरिक्त इंफाळमधील नागरिक घरामध्येच राहिले. पोलिस महासंचालक पी. डोंगेल यांनी सांगितले की, राज्याच्या गृह विभागाचा दिसताचक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश हा शेवटचा उपाय आहे. जर नागरिक शांतपणे निघून गेले तर त्याची गरजच उरणार नाही. पोलिस जनतेशी जसा व्यवहार करतात, तसे लष्कर करत नाही. लष्कराला शत्रूशी लढण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे, तर पोलिसांना त्यांच्या स्वतःच्या लोकांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे परिस्थिती शांत होईपर्यंत शांतपणे घरात राहावे, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.

 

पी. डोंगेल यांनी राज्यातील नागरिकांना त्यांनी लुटलेली शस्त्रे आणि दारूगोळा परत करण्याचे आवाहन केले. ‘तेथे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि आम्हाला यात सहभागी असलेल्या लोकांबद्दल माहीत आहे. येत्या काही दिवसांत शस्त्रे परत द्यावीत, अन्यथा आम्हाला अतिशय कठोर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला. शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिक ही शस्त्रे एका ठिकाणी सोडून परत करू शकतात. स्वत:ची ओळखही न सांगता ते पोलिसांना याबाबत कळवू शकतात, असे ते म्हणाले. एकंदरीत राज्यात अजूनही तणावपूर्ण परिस्थिती असली तरी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केल्यामुळे हिंसाचार आटोक्यात आला आहे. इंफाळमध्ये काही ठिकाणी जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

Exit mobile version