झारखंडच्या जमशेदपूरमध्ये रविवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर या भागात अजूनही तणावाचे वातावरण आहे. येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस परिसरात गस्त घालत आहेत. आतापर्यंत ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरातील कदम शास्त्रीनगर ब्लॉक क्रमांक दोनमध्ये ९ एप्रिल रोजी सायंकाळी दोन समुदायांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी गोळीबारही करण्यात आला पण सुदैवाने कुणाला गोळी लागली नाही. हिंसाचाराच्या घटनेनंतर प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांसोबत आरएफची एक कंपनीही तैनात करण्यात आली आहे. या गोंधळात काही चोरट्यांनी दुकाने पेटवून दिली. यामध्ये सहा दुकाने आणि एक दुचाकी जळून खाक झाली. या हिंसाचारात काही पोलीसही जखमी झाले आहेत. परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मंदिर वही बनायेंगेचा नारा सत्यात उतरतांना बघतोय
शरद पवारांनी केली विचारवंत, पुरोगाम्यांची कोंडी
भारतातील वाघांची संख्या वाढली, आता ३१६७ वाघ
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागून प्रकरण संपवायला हवं होतं!
शनिवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी कदामा चौकात धार्मिक झेंड्याला बांधलेल्या मांसाच्या तुकड्यावरून वाद सुरू झाला. ज्याला हिंदू संघटनांनी विरोध केला. मात्र, काही वेळाने प्रकरण शांत झाले. रविवारी ९ एप्रिल रोजी कदम शास्त्री नगर ब्लॉक क्रमांक २ मधील जटाधारी हनुमान मंदिरात हिंदू संघटनांची बैठक सुरू होती, त्यावेळी पुन्हा दोन गट समोरासमोर आले.
यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि गोळीबार झाला. दुकाने जाळण्यात आली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी सहा हल्लेखोरांना अटक केली आहे.