जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा चकमक; लष्कराचे दोन जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा चकमक; लष्कराचे दोन जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. याला लष्कराच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याची माहिती आहे. डोडा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी चकमक झाल्याने खळबळ उडाली आहे.

डोडा जिल्ह्यामधील कास्तीगढ भागातील गावात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. दहशतवाद्यांनी शोध मोहिमेसाठी एका सरकारी शाळेत स्थापन केलेल्या तात्पुरत्या सुरक्षा छावणीला लक्ष्य केले. या हल्ल्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत २ जवान जखमी झाले.

दरम्यान, जखमी जवानांवर डोडा येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यांना पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरद्वारे लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. दहशतवादी हल्ल्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असून साधारण एक तासाहून अधिक काळ चकमक सुरु होती.

यापूर्वी, सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यानच्या रात्री देसा आणि जवळच्या जंगल भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. देसा वन क्षेत्रात झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्करातील कॅप्टनसह चार जवान तसेच एक पोलिस कर्मचारी, असे पाच जण हुतात्मा झाले होते. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिस दलाकडून सोमवारपासूनच या भागात शोधमोहीम सुरू आहे. जद्दन बाटा गावातही शोध मोहीम सुरु असताना पहाटे दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

हे ही वाचा:

गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, १२ माओवाद्याना कंठस्नान !

पोलीस कोठडीचे गज वाकवून आरोपीचे पलायन, सांताक्रूझ वाकोल्यातील घटना !

निवडणुकीच्या लगबगीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आयईडी स्फोटात दोन जवान हुतात्मा

राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी डोडा शहरापासून ५५ किमी अंतरावर लपलेल्या दहशतवाद्यांसाठी संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर रात्री जवानांनी हल्ला केल्यानंतर चकमक सुरु झाली होती. सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती याचं माहितीच्या आधारे, डोडाच्या उत्तरेकडील सामान्य भागात लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांचे ठिकाण कळताच गोळाबीर सुरु करण्यात आला होता, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘काश्मीर टायगर्स’ या जैश-ए-मोहम्मदची एक शाखा असलेल्या संघटनेने याची जबाबदारी घेतली.

Exit mobile version