तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या वाधवान बंधूंना वैद्यकीय तपासणीच्या निमित्ताने तुरुंगाबाहेर काढून त्यांना शहराची सैर घडवल्याच्या आरोपाप्रकरणी तळोजा तुरुंगातील एका अधिकाऱ्यासह सहा हवालदारांना मुंबई पोलिसांनी मंगळवारी निलंबित केले आहे. वाधवान बंधूंना वैद्यकीय तपासणीसाठी तुरुंगातून बाहेर काढण्यास हे अधिकारी जबाबदार होते.
वाधवान बंधूंना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात जाण्याची गरज असल्याचे भासवून त्यांना अनेक ठिकाणी बाहेर नेले जात होते. वाधवान बंधू सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. हे वारंवार तुरुंगाबाहेर कसे जात असत, याचे चित्रिकरणच एका वृत्तवाहिनीला मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
अधिकृतरीत्या मंजूर झालेल्या या बनावट वैद्यकीय ‘सहलीं’मुळे त्यांना त्यांच्या पोलिस एस्कॉर्ट्सच्या देखरेखीखाली योग्य जेवण घेणे, लॅपटॉप आणि मोबाइल फोन वापरणे आणि अगदी व्यावसायिक व्यवहार करणे शक्य झाले. यावेळी पोलिस एस्कॉर्ट्सनाही अल्पोपहार देण्यात आला.
कपिल वाधवन यांची केईएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना ७ ऑगस्ट रोजी तळोजा कारागृहातून सोडण्यात आले. मात्र त्यांची गाडी रुग्णालयात जाण्याऐवजी रुग्णालयाच्या पार्किंगकडे वळल्याचे आढळून आले, जिथे त्याचे कुटुंब आणि सहकारी त्यांच्या खासगी गाड्यांसह त्यांची वाट पाहत होते. दोन दिवसांनंतर, धीरज वाधवनही वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने तळोजा कारागृहातून जेजे रुग्णालयासाठी तुरुंगातून बाहेर पडले.
हे ही वाचा:
चीनच्या कुरापती सुरूच; अक्साई चीन परिसरात उभारले जात आहेत बंकर
पंतप्रधानांची रक्षाबंधन भेट; गॅसच्या किमती २०० रुपयांनी घटल्या
लोकसभेच्या १६० कमकुवत जागा जिंकण्यासाठी अमित शहा सरसावले
आशिया चषकावर भारतीय महिला हॉकी संघाने कोरले नाव
या वृत्तवाहिनीने मिळवलेल्या माहितीनुसार, तुरुंग आणि रुग्णालयाच्या नोंदींनुसार कपिल वाधवनच्या बाह्य वैद्यकीय भेटींची वारंवारता लक्षणीयरीत्या अधिक होती. धीरज वाधवनच्या बाबतीतही असेच दिसून आले. याबाबतची चित्रफीत प्रसिद्ध होताच मुंबई पोलिसांनी दोन्ही भावांच्या एस्कॉर्ट टीमचा भाग असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित केले. वाधवान बंधूंवर गुन्हेगारी कटात त्यांच्या कथित सहभागासाठी खटला सुरू आहे. त्यांनी एकूण १७ बँकांची फसवणूक केल्याचे सांगितले जाते. सीबीआय आणि पोलिसांनी त्यांच्यावर सुमारे सहा गुन्हे दाखल आहेत. ईडीकडूनही त्यांची चौकशी सुरू आहे.