एका ख्रिश्चन धर्मीयांकडून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी घराबाहेर विसर्जन मिरवणूकीच्या वाटेवर पेटत्या निखाऱ्यावर मिरच्या टाकून धुरी तयार करून मिरवणूक उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना नालासोपारा येथे घडली आहे.त्याच दरम्यान या व्यक्तीकडून घराबाहेर वादग्रस्त फलक लावल्यामुळे नालासोपाऱ्यात मोठा तणाव निर्माण झाला होता.मात्र नालासोपारा पोलीसांनी वेळेत घटनास्थळी धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणली आहे पोलीसांनी जातीय तेढ निर्माण करणा-या सबंधीतांना नोटीस बजावली असून नागरीकांनी समाज माध्यमांवर तेढ निर्माण करणा-या अफवा पसरवू नका असे आवाहन नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी केले आहे.
नालासोपारा पश्चिम नाळे डिसील्वानगर येथील श्री साई यूवा मंडळाच्या सार्वजनिक गणेशाच्या शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास विसर्जन मिरवणूक निघाली होती.यावेळी बोडणनाका येथे राहणारे निवृत्त शिक्षक मायकल लोपीस यांनी घराबाहेर अंगणात मिरच्या पेटवून धुरी तयार केली होती. मिरवणूक त्यांच्या राहत्या घरासमोर आली असताना मायकल यांनी त्या पेटत्या मिरच्या गेटजवळ नेऊन ठेवल्यामुळे मिरवणुकीत सामील झालेल्यांना त्रास झाला.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याचा जाब मायकल यांना विचारल्यावर त्यांनी घरातून लाकडी दांडका आणून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.
हे ही वाचा :
सत्ता आल्यास एक तासात दारूबंदी रद्द करणार
‘क्रिकेटचा फिवर शरीयाच्या विरोधात, तालीबान्यांकडून क्रिकेट बंदीची शक्यता’
चंदीगड ग्रेनेड स्फोट: दिल्लीतून दुसऱ्या आरोपीला अटक !
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर डॅलसमध्ये डल्ला! हीच का काँग्रेसची लोकशाही?
या घटनेनंतर शनिवारी सकाळी मायकल यांनी घराबाहेर गेटवर फळ्यावर काही आक्षेपार्ह मजकूर लिहून ठेवला होता.आदल्या रात्री घडलेल्या घटनेनंतर लोपीस कुटुंबानी हा आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे परीसरातील नागरीक एकत्र आले होते.नाळे भंडार आळी, लाखोडी,पढई,वाळूंजे, डिसिल्वा नगर आदी परीसरातील शेकडो नागरीकांनी लोपीस यांच्या घराबाहेर एकत्र येऊन घोषणाबाजी करत शुक्रवारच्या घटनेबद्दल व फळ्यावरील मजकुराबाबत जाब विचारला.यादरम्यान नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणली.
याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात सदर घटनेची कागदोपत्री नोंद केली असून समोरच्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करत नोटीस बजावली असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दिली आहे.याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नसुन गणेशोत्सवादरम्यान कोणीही समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा जातीय तेढ निर्माण करणारे विधान करू नये असे आवाहन सदाशिव निकम यांनी केले आहे.नाळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे.