गादीवर ५०० रुपयांच्या नोटांची थप्पी… आणि त्यासोबत हसणारी दोन मुले.. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या छायाचित्राने सध्या खळबळ माजवली आहे. चौकशीअंती ही मुले उन्नाव येथील बेहटा मुजावर पोलिस ठाण्याचे अधीक्षक रमेशचंद्र साहनी यांची असल्याचे उघड झाल्यानंतर ते स्वत:ही अडचणीत आले आहेत. त्यांच्याकडून या पोलिस ठाण्याचा कार्यभार काढून घेण्यात आला असून या प्रकरणाचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे.
या छायाचित्रात दोन मुले ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलांसोबत खेळत असल्याचे दिसत आहे. हे रुपये साडे १३ ते साडे १४ लाख रुपये असू शकतात. पैशांसोबत मुलांची छायाचित्रे व्हायरल झाल्याने पोलिसांमध्ये भूकंप झाला आहे. ही मुले पोलिस अधीक्षक रमेशचंद्र साहनी यांची असल्याचे कळल्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी हे पैसे लाचखोरीचे असल्याची म्हटले आहे. वरिष्ठ पोलिसांनीही तातडीने या प्रकाराची दखल घेत त्यांच्याकडून पोलिस ठाण्याचा कार्यभार काढून घेतला असून या अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
दोन वर्षांपासून एकाच पोलिस ठाण्यात
पोलिस ठाण्याचे प्रभारी असणारे साहनी यांची दोन वर्षांपूर्वी हरदोई येथून बदली होऊन आले होते. त्यानंतर या पोलिस ठाण्यात अनेकदा निष्काळजीच्या, बेजबाबदारपणा होत असल्याच्या तक्रारीही आल्या. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या कार्यशैलीवरही अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले होते.
हे ही वाचा:
भारत- पाक सामन्यासाठी हॉटेलचे दर गगनाला भिडले
…हा तर स्वतःचे काळे कारनामे झाकण्यासाठी मुंबई महापालिकेवर मोर्चा
भारतातल्या परिचारिका का निवड करत आहेत जर्मनीची?
ठरलं… मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघाला
घराच्या दुरुस्तीसाठी पैसे
रमेशचंद्र साहनी यांनी या पैशांचा खुलासा दिला आहे. त्यांनी घराची दुरुस्ती करण्यासाठी हे पैसे उसने घेतले असल्याचा दावा केला आहे. ही घटना नोव्हेंबर २०२१ची आहे. मात्र हे छायाचित्र आता व्हायरल झाली, असेही त्यांचे म्हणणे आहे. मुलांनी पैशांसोबत कधी छायाचित्र काढले, हेही त्यांना समजले नाही, असेही ते म्हणाले. अर्थात चौकशीनंतरच खरे काय ते बाहेर येणार आहे.