छोटा शकीलचा मेहुणा असल्याचे सांगून एका बांधकाम व्यवसायिकाकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एनआयए अटकेत असलेला छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबूबकर उर्फ आरिफ भाईजानसह तीन जणांविरुद्ध विरुद्ध डोंगरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.
कुख्यात गुंड छोटा शकील याचा साडू सलीम फ्रुट तसेच मेहुणा आरिफ भाईजान या दोघांना काही महिन्यांपूर्वी केंद्रीय तपास संस्था (एनआयए) ने टेरर फंडिंगच्या गुन्हयात अटक केली आहे. हे दोघे यापूर्वी छोटा शकील याचा मुंबईतील सर्व व्यवहार व वसुली सलीम फ्रुट आणि आरिफ भाईजान हे दोघे बघत होते. बांधकाम व्यवसायिकांना धमकी देणे, खंडण्या उकळने त्याच बरोबर मुंबईतील बेकायदेशीर धंदे सांभाळणे ही सर्व कामे हे दोघे बघत होती. या दोघांना एनआयएने अटक केल्यानंतर अनेक जण या दोघांविरुद्ध तक्रारी देण्यास पुढे येऊ लागले आहे.
काही आठवड्यापूर्वी सलीम फ्रुट याच्याविरुद्ध मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. शनिवारी दक्षिण मुंबईतील एक बांधकाम व्यवसायिक आरिफ भाईजान विरोधात तक्रार देण्यासाठी डोंगरी पोलीस ठाण्यात दाखल झाला व त्याने आरिफ भाईजान याने मीरा रोड येथील एका वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारात ५कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे. छोटा शकीलचा मेहुणा असल्याचे सांगून खंडणी दिली नाही तर कुटुंबासह ठार मारण्याची धमकी आरिफ भाईजान याने दिली असल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ट्रेनचे ‘नाक’ बदलले
म्हणून लोकलमध्ये महिलांमध्ये होते हाणामारी
‘शिवसेना’ नाव प्रबोधनकारांनी ठेवले की आचार्य अत्रेंनी?
विकास हवा असल्यास प्रकल्पांना विरोध नको
आरिफ भाईजान तसेच मीरा रोड येथील शहा नावाचा बांधकाम व्यवसायिक आणि एक इस्टेट एजंटचा या गुन्हयात समावेश असल्याचे या बांधकाम व्यवसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरिफ अबूबकर शेख उर्फ भाईजान याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा खंडणी, धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले आहे. खंडणी विरोधी पथकाकडून आरिफ भाईजानचा ताबा घेण्यासाठी एनआयए न्यायालयात अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.