कोरोनाच्या काळात महाभयंकर रोगामुळे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोनाकाळ उलटून देश पूर्वपदावर येत आहे. मात्र अजूनही नागरिक नोकऱ्यांच्या शोधात आहेत. काही लोक नोकऱ्यांचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन महिलांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कतार या देशामध्ये नोकरी लावतो असे सांगून, १५ जणांची १२ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. तपासाअंती रकमेत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हा गुन्हा नवी मुंबई वाशी येथील पोलीस ठाण्यात नोंदवला असून, तस्नीम सहीबोले, निदा शेख हे महिला आरोपी नाव असून, यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा मीनाक्षी गजभिये यांनी नोंदवला आहे.
एअर होस्टेस म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण आणि नोकरी देणारी संस्था ‘फ्रॅंकलिन इन्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग सेंटर’ या नावाची कंपनी वाशी येथे आहे. याच कंपनीत तस्नीम सहीबोले ही महिला समुपदेशक म्हणून काम करीत होती. १६ जून रोजी त्या नसताना आलिया नावाची एक युवती कार्यालयात आली व तक्रारदार कर्मचारी मीनाक्षी गजभिये यांच्याकडे ४५ हजार रुपयांची मागणी करू लागली, माझ्याकडून तुमच्या कंपनीने ‘एअर कार्गो कतार’मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ४५ हजार रुपये घेतले आहेत, असे तिने सांगितले.
हे ही वाचा:
उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला
जालन्यात ३९० कोटींचं घबाड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई
जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
लालसिंह चढ्ढाची तिकीट खिडकी ओस
याबाबत कंपनीने कागद पडताळणी करून तपासले असता. ४५ हजार भरल्याची कोणतीही नोंद दिसत नव्हती. याशिवाय कोणत्याही शाखेत प्रवेश घेतल्याचेही नोंद नव्हती. याबाबत सहीबोले यांच्या कडे विचारणा केली असता तिने ‘ऑनलाईन’ असेल असे सांगून वेळ मारून नेली. कंपनीने अंतर्गत चौकशी केली असता सहीबोले यांनी ‘फ्रॅंकलिन इन्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग सेंटर’च्या नावाने १५ लोकांना वैयक्तिक संपर्क करून १२ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. यासंदभात मीनाक्षी गजभिये यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस सहीबोले यांनी अशा किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा तपास करीत आहेत.