सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणातील भ्रष्टाचारासंदर्भातील हे प्रकरण आहे. राज्यसभेत खासदार असलेल्या संजय सिंग यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ऑक्टोबरमध्ये ताब्यात घेण्यात आले असून सध्या ते तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. ४ डिसेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
ईडीने म्हटले आहे की, सिंग आणि त्यांचे सहकारी २०२०मध्ये मद्यविक्री दुकानांना परवाने देण्याच्या निर्णयात सहभागी होते. त्यातून सरकारच्या महसुलाला मोठा फटका बसला. शिवाय, त्यांनी भ्रष्टाचारविरोधी कायद्यांचे उल्लंघनही केले.
संजय सिंग यांच्या मालकीच्या किंवा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर ईडीने याआधी छापे घातलेले आहेत. त्यात त्यांचे घर आणि कार्यालयांचा समावेश आहे. तसेच त्यांचे जवळचे सहकारी अजित त्यागी यांच्याही घर आणि कार्यालयांचा समावेश आहे. ज्यांना या भ्रष्टाचारात वाटा मिळाला त्या कंत्राटदार आणि व्यावसायिकांच्या घरावरही छापे मारण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
तमिळनाडूत २० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक
मुंबई महापालिकेतील कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार
मुंबईत नऊ जानेवारीला शाश्वत पर्यावरण विकास परिषद
गांगुली म्हणतात, “कर्णधार म्हणून रोहितच बेस्ट!”
६ डिसेंबरपर्यंत सिंग यांच्या जामीन अर्जाविरोधात ईडीने आपले म्हणणे मांडावे असे न्यायालयाने म्हटले होते. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि दिल्लीतील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे की, हा घोटाळा वगैरे काही नाही. आरोप खोटे आहेत. तपास करणाऱ्या संस्थांना कोणतेही पुरावे सादर करता आलेले नाहीत. केवळ अरविंद केजरीवाल यांना अटक करून दिल्लीतील सरकारला चाप लावणे हाच यामागील उद्देश आहे. त्यामुळे पक्षाचे सर्व कार्यकर्ते विविध ठिकाणी जाऊन लोकांचे मत जाणून घेत आहेत. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. दिल्लीतील जनता ही केजरीवाल यांच्यावर प्रेम करते आणि त्यांनीच मुख्यमंत्री राहावे हीच त्यांची इच्छा आहे.
दिल्लीतील या मद्य घोटाळ्यात उत्पादन शुल्क धोरणात अनेक गैरप्रकार आढळले. काही व्यापाऱ्यांवर मर्जी दाखविण्यात आली आणि त्यासाठी त्यांना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे.