राज्यात हिट अँड रनची प्रकरणे वारंवार समोर येत असून आता नागपूरमधून असेच एक अपघाताचे प्रकरण समोर आले आहे. एका ऑडी गाडीने रविवारी मध्यरात्री नागपूरमधील रामदास पेठ परिसरात पाच दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना धडक दिली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही मात्र, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गाडीची नोंदणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावाने असल्याचे समोर आले आहे. सध्या या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या मालकीच्या ऑडी कारने सोमवारी नागपुरात अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेनंतर कारमधील दोघांना अटक करण्यात आली असून संकेत बावनकुळेसह उर्वरित तिघे घटनास्थळावरून पळून गेल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. या अपघातावेळी अर्जुन हावरे आणि रोनित चिंतनवार हे दोघे मद्यधुंद अवस्थेत होते, असा प्राथमिक अहवाल आहे. तर, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे १ वाजता ऑडी कारची प्रथम तक्रारदार जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला आणि नंतर मोपेडला धडक बसली, यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी संकेत बावनकुळे याच्यासह कारमध्ये एकूण पाच जण होते. ही घटना घडली तेव्हा आरोपी धरमपेठेतील एका बारमधून परतत होते.
अपघातग्रस्त जितेंद्र सोनटक्के (वय ४० वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चालक अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार यांना अटक केली आहे. पोलिसांनी गाडी जप्त करून पोलीस ठाण्यात आणली असून त्यावेळी तिची ‘नंबर प्लेट’ काढण्यात आल्याचे समोर आल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
प. बंगाल: भाजपा बूथ अध्यक्ष विजय भुईया हत्येप्रकरणी एनआयएकडून छापेमारी
गणपती मंडपावर दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा ‘प्रसाद’
४,२०० कोटी रुपये कोटी द्या नाहीतर… अदानी समुहाचा बांगलादेशला इशारा
दिल्लीत १ जानेवारीपर्यंत फटाके विक्री आणि खरेदीवर ‘पूर्ण बंदी’
या प्रकरणी विरोधकांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका होता असून त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गाडी त्यांच्या मुलाच्या नावावर असल्याचेही त्यांनी कबुल केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कोणालाही वेगळा न्याय देता कामा नये, असे स्पष्ट केले आहे.