स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दादरमध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याच्या एका निनावी कॉलने मुंबईत खळबळ उडवून दिली आहे. मुंबई सायबर हेल्पलाईनवर अज्ञात व्यक्तीकडून कॉल करून धमकी देण्यात आलेली असून मुंबई पोलिसांकडून दक्षता घेण्यात येत आहे. कॉल करणाऱ्याची माहिती काढण्यात येत आहे. या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या मुंबई सायबर हेल्पलाईन क्रमांकावर शनिवारी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून ‘१५ अगस्त के दिन दादर मे सिरीयल ब्लास्ट होगा’ अशी माहिती दिली, पोलिसांनी त्याचे नाव आणि पत्ता जाणण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन कट केला.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांना सतर्क करण्यात आले असून पोलिसांनी श्वान पथकासह संपूर्ण दादर परिसरात शोध घेतला मात्र, पोलिसांना कुठेच काही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी दादर आणि इतर मुंबईतील अतिसंवेदनशील परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. परिसरातील हॉटेल,पार्किंग या ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली.
हे ही वाचा:
भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर चौथ्यांदा कोरले नाव
राज्यात ह्युंदाई कंपनी चार हजार कोटींची गुंतवणूक करणार
‘मणिपूर हिंसाचारावर लष्कर हा तोडगा नाही’
त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!
कॉल करणाऱ्या विरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कॉल करणाऱ्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.