केंद्र सरकारने द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टीआरएफ या दहशतवादी गटावर बंदी घातली आहे. टीआरएफ हा पाकिस्तानस्थित प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा आघाडीचा गट आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक टार्गेट किलिंगमध्ये त्याचा सहभाग आहे. गृह मंत्रालयाने टीआरएफवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे. गेल्या काही वर्षांत काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित कामगारांवर तसेच काश्मीरमधील सुरक्षा दल आणि नागरिकांवर झालेल्या बहुतांश हल्ल्यांमागे टीआरएफचा हात होता.
टीआरएफ कमांडर सज्जाद गुल याला भारत सरकारने यापूर्वीच दहशतवादी घोषित केले आहे.
टीआरएफ दहशतवादी कारवायांना पुढे नेण्यासाठी, दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी, दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी आणि पाकिस्तानमधून जम्मू आणि काश्मीरमध्ये शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून तरुणांची भरती करत असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये लष्कर-ए-तैयबाचा हात आहे. टीआरएफ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांना भारत सरकारच्या विरोधात भडकावत आहे आणि त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील करण्यासाठी प्रचाराचा अवलंब करत आहे. टीआरएफ च्या विध्वंसक कारवाया लक्षात घेऊन या संघटनेवर प्रतिबंध घालण्यात आला असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ यांच्या भेटीमुळे मविआ नेत्यांची पोटदुखी वाढली
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’
उत्तर भारतीय जनतेच्या द्वेषावर काँग्रेस फोफावली; आदित्यनाथांच्या भेटीवरून राजकारण
अजित पवार यांची वैचारिक उंची कळली
लष्कर कमांडर मोहम्मद अमीन उर्फ अबू खुबेब याला दहशतवादी घोषित करण्यात आले. सरकारी अधिसूचनेनुसार, अबू खूबैब मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे, परंतु सध्या तो पाकिस्तानमध्ये राहत आहे. खुबैब हा लष्कर-ए-तैयबाचा लाँचिंग कमांडर म्हणून काम करत असून त्याचे पाकिस्तानच्या एजन्सीशी जवळचे संबंध आहेत. जम्मू प्रदेशात लष्कराच्या दहशतवादी कारवायांना पुनरुज्जीवित करण्यात आणि तीव्र करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सीमापार दहशतवादी हल्ले, शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांचा पुरवठा आणि दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यात खुबैबचा सहभाग आहे.