केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने काही युट्यूब वाहिन्यांवरील व्हिडीओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या आणि द्वेष पसरवून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी मूळ चित्रफितीत फेरफार (मॉर्फ) करण्यात आले होते.
दहा युट्यूब वाहिन्यांवरील ४५ चित्रफिती हटवण्याचे निर्देश माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. यात ‘द लाइव्ह टीव्ही’वरील १३ व्हिडीओंचा समावेश आहे. तर ‘इन्किलाब लाईव्ह’ आणि ‘देश इंडिया लाइव्ह’चे प्रत्येकी सहा व्हिडीओंचा समावेश आहे. ‘हिंद व्हॉईस’चे नऊ, ‘गेट सेट फ्लाय फॅक्ट’ आई ‘फॉर पीएम’चे प्रत्येकी दोन, ‘मिस्टर रिअॅक्शनवाला’चे चार आणि ‘नॅशनल अड्डा’, ‘ध्रुव राठी’ आणि ‘विनय प्रताप सिंग भोपर’ या वाहिन्यांवरचे प्रत्येकी एक व्हिडीओ हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. या वाहिन्या देशात धार्मिक द्वेष पसरवण्याच्या कटात सहभागी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केला आहे. आगामी काळातही अशा आक्षेपार्ह वाहिन्या आणि संकेतस्थळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
भुजबळ म्हणतात, सरस्वतीची नको, सावित्रीची पूजा करा
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मुख्यमंत्री अशोक गेहलोत बॅकफूटवर?
PFI च्या निशाण्यावर होते संघाचे मुख्यालय
रशियामध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू
या युट्युब वाहिन्यांपैकी काहींनी जम्मू-काश्मीर आणि लडाखचे काही भाग भारतीय नकाशाच्या हद्दीबाहेर दाखवले आहेत. मंत्रालयाच्या निवेदनात नमूद केले आहे की, असे चुकीचे नकाशे सार्वजनिकरीत्या प्रसृत करणे भारताच्या सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेसाठी हानिकारक आहे. २०२१ च्या माहिती- तंत्रज्ञानासंबंधीच्या (मार्गदर्शक तत्त्वे व ‘डिजिटल मीडिया’ आचारसंहिता) अधिनियम तरतुदींतर्गत या चित्रफिती रोखण्याचे आदेश २३ सप्टेंबरला देण्यात आले. या सर्व चित्रफितींना एकूण १ कोटी ३० लाख प्रेक्षकांनी पाहिल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.