सोमवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणीखोरीच्या आरोपात सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या चौकशीच्या आ देशांनंतर अनिल देशमुख ह्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणात सीबीआयची एन्ट्री झाल्यानंतर सीबीआय लगेचच ऍक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. मंगळवार ६ एप्रिल रोजी सीबीआयची तुकडी महाराष्ट्रात दाखल होणार असून ते देशमुखांवर आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करणार आहेत. सीबीआयचा हा संपूर्ण तपास सीबीआयच्या संचालकांच्या देखरेखीत होणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केले होते. सचिन वाझे याला गृहमंत्र्यांनी महिना १०० कोटी रूपये आणून देण्याचे टार्गेट दिले होते असा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला होता. या पत्रावरून डॉक्टर जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात पुढील पंधरा दिवसात प्राथमिक चौकशी करून दखलपात्र गुन्हा आढळल्यास एफआयआर नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. डॉक्टर जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयाबाहेर ही माहिती माध्यमांना दिली. या याचिकेवर सुनावणी करत असताना, अनिल देशमुख गृहमंत्री पदावर असताना, पोलीस निष्पक्ष तपास करू शकत नाहीत. असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
हे ही वाचा:
देशमुख लगबगीने दिल्लीला..अभिषेक मनू सिंघवींच्या घरी
अनिल देशमुखांचा राजीनामा हे केवळ हिमनगाचं टोक
कुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय?
या निर्णयानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर अनिल देशमुख हे नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले. देशमुख यांनी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देऊन थेट दिल्ली गाठली. देशमुख आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हंटले जात आहे. जेष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी हे देशमुखांची बाजू मांडणार असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीत देशमुख यांनी अभिषेक मनू सिंघवी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले तर यावर तिथे काय निकाल दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.