आंध्र प्रदेशच्या विझाग बंदरात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने मोठी कारवाई करत अमलीपदार्थ असलेला कंटेनर ताब्यात घेतला आहे. तपास यंत्रणेला कंटेनरमधून ड्राय यीस्टची २५ हजार किलोची पॅकेट्स आढळली असून त्यामध्ये ड्रग्ज सापडले आहेत. यानंतर संपूर्ण माल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, यातील सामान ब्राझीलच्या सँटोस बंदरातून भारतातील विशाखापट्टणम येथील एका खासगी कंपनीला पाठवायचे होते. शिपरच्या कागदपत्रांमध्ये असे लिहिले होते की, कंटेनरमध्ये २५ किलो निष्क्रिय ड्राय यीस्टच्या एक हजार पिशव्या असून त्याचे एकूण वजन २५ हजार किलो आहे.
‘ऑपरेशन गरुड’चा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित ड्रग कार्टेलच्या विरोधात लढा देताना, सीबीआयने इंटरपोलद्वारे मिळालेल्या माहितीवरून विशाखापट्टणममधील सीमाशुल्क विभागाच्या मदतीने कारवाई करत बुधवारी विशाखापट्टणम बंदरावर एका शिपिंग कंटेनरला ताब्यात घेतले. हा कंटेनर सँटोस पोर्ट, ब्राझील येथून विशाखापट्टणम येथे डिलिव्हरीसाठी बुक करण्यात आला होता. शिपरने त्यांच्या माहितीत म्हटले होते की, संबंधित कंटेनरमध्ये प्रत्येकी २५ किलो वजनाच्या एक हजार पिशव्या या वाळलेल्या निष्क्रिय यीस्टच्या आहेत. त्याचे वजन २५ हजार किलो आहे. मात्र, प्राथमिक तपासणीत, नार्कोटिक्स पदार्थ शोधण्याच्या यंत्रणेद्वारे असे आढळून आले की पाठवलेल्या सामग्रीमध्ये म्हणजेच वाळलेल्या निष्क्रिय यीस्टमध्ये अमलीपदार्थ मिसळलेले आहेत.
संपूर्ण माल जप्त करण्यात आला असून मालवाहू आणि इतर अज्ञातांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या मोहिमेतून हे स्पष्ट झाले की, अमलीपदार्थ आयात करण्यात गुंतलेले आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क हे सामान्यत: कटिंग एजंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतर पदार्थांमध्ये मिसळून अमलीपदार्थांची वाहतूक करते. इंटरपोलकडून आलेल्या इनपुटच्या आधारे, सीबीआयने यापूर्वीही अशा मोहीम केल्या असून एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे सीबीआयने सांगितले आहे.
कंटेनर जप्तीनंतर सीबीआयने दाखल केलेल्या आठ पानांच्या अहवालानुसार, कंटेनरमधील प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये फिकट पिवळ्या रंगाची पावडर होती. यात कोणत्याही अमली पदार्थांची उपस्थिती ओळखण्यासाठी एनसीबी नार्कोटिक ड्रग्स डिटेक्शन किट अंतर्गत तपासणी केली गेली. ड्रग्स डिटेक्शन किटद्वारे केलेल्या तपासणी दरम्यान, प्रत्येक २० पॅलेटमधून बाहेर काढलेल्या सर्व २० पिशव्यांमध्ये कोकेन/मेथाक्वॉलोनची चाचणी सकारात्मक आली.
In a major operation CBI detained a shipping container at Andhra’s Vizag port suspected to have carrying narcotics drugs mixed with 25000kilos of dried yeast. Entire consignment has been seized & a case registered.
The container is destined to a shrimp hatchery in Vizag.
As a… pic.twitter.com/XsgQ3OT0Aw
— SNV Sudhir (@sudhirjourno) March 21, 2024
या सर्व कारवाई दरम्यान, “आंध्र प्रदेश सरकारचे विविध अधिकारी आणि बंदर कर्मचारी घटनास्थळी जमले होते. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईला विलंब झाला,” असे सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसच्या सहाव्या यादीतून पाच उमेदवार जाहीर
केजरीवालनी खलिस्तानी चळवळीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते!
प्रभू रामललाने भव्य महालात साजरी केली होळी!
मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मुईझ्झुंना सांगितले…दुराग्रह सोडा, शेजाऱ्यांशी जुळवून घ्या!
विझाग बंदरात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केल्यानंतर तेलगु देसम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र डागत नाराजी व्यक्त केली आहे. आंध्र प्रदेश भारताची ड्रग्स कॅपिटल बनल्याबद्दल चिंता व्यक्त केली असून तरुणांचे भविष्य धोक्यात असल्याचे म्हटले आहे. तसेच एन चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश पोलीस आणि बंदर कर्मचाऱ्यांकडून सीबीआयला सहकार्य केले जात नसल्याचा आरोप केला. आंध्र प्रदेशमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची खेप येणं हे गंभीर असून आगामी निवडणुकीच्या तोंडावर या ड्रग्समागे सत्ताधारी पक्षाचे काय हेतू असू शकतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.