शिवसेनेला (उबाठा) आणखी मोठा धक्का बसला आहे, एकीकडे रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरू असताना केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने शिवसेना (उबाठा) खासदार अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेना उबाठा गटाच्या नेते केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आलेले आहेत.एकीकडे ईडीकडून सोमवार दुपार पासून रवींद्र वायकर यांच्याकडे चौकशी सुरू आहे. तर मंगळवारी खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलविले असताना शिवसेना उबाठा गटाला धक्का देणारे वृत्त समोर आले.
केंद्रीय अन्वेषण विभागाने शिवसेनेचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्या वरून ईडीकडून बोभाटे विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता असून या गुन्ह्याचे धागेदोरे अनिल देसाई पर्यत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाकडून दिनेश बोभाटे यांच्या विरोधात मिळकती पेक्षा ३६ टक्के बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप दाखल करण्याचे आलेल्या एफआयआर मध्ये करण्यात आला आहे. दिनेश बोभाटे एका विमा कंपनीमध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा आरोप सीबीआय कडून करण्यात आला आहे.दिनेश बोभाटे यांनी २ कोटी ६० लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता कमविल्याचा आरोप बोभाटे यांच्यवर लावण्यात आला आहे.
हे ही वाचा:
‘मम्मी, पापा, मी जेईई पास होऊ शकत नाही, राजस्थान येथील १८ वर्षीय मुलीची आत्महत्या!
रणजित सावरकरांच्या पुस्तकातून गांधीजींच्या हत्येवर प्रश्नचिन्ह
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा म्हणजे राजकीय पर्यटन
लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख ठरली!
केंद्रीय अन्वेषण विभागाने दिनेश बोभाटे आणि त्यांची पत्नी देवश्री बोभाटे यांच्या विरोधात १७ जानेवारी रोजी सीबीआयच्या मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला आहे. दिनेश बोभाटे हे २०१३ ते २०२३च्या कालाव धीत एका विमा कंपनीत वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी संबंधित विमा कंपनीत टप्प्याटप्प्याने जवळपास ३६ टक्के बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने केला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून बोभाटे दाम्पत्यांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीकडूनही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. दिनेश बोभाटे यांच्या अडचणीत वाढ झाल असून बोभाटे हे अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक असल्यामुळे त्यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.