युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या समुहाची ३४ हजार ६१५ कोटी रुपयांसाठी फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) जी छापेमारी केली त्यात त्यांना ४० कोटींची चित्रे आणि शिल्पकृती मिळाल्या आहेत. शिवाय, काही कागदपत्रेही त्यांनी जप्त केली आहेत.
मुंबई आणि महाबळेश्वर येथील दिवाण विला येथे केलेल्या छापेमारीत सीबीआयने मोठ्या प्रमाणात चित्रे व शिल्पकृती जप्त केल्या आहेत. या सर्व वस्तूंची किंमत ४० कोटींच्या घरात आहे.
यासंदर्भात केलेल्या तपासातून हे स्पष्ट झाले की, प्रमोटर्सनी हा पैसा अन्यत्र वळवून वेगवेगळ्या स्वरूपात गुंतविला आहे. त्यासाठी ही चित्रे आणि शिल्पकृती विकत घेतल्या गेल्या. ही गुंतवणूक ५५ कोटींच्या घरात आहे.
हे ही वाचा:
वीर सावरकरांची शौर्यगाथा सांगणारे संग्रहालय दक्षिण मुंबईत उभारणार!
…त्यांनी ‘भरोसा’ दिला; कुवेतमध्ये बंदिस्त जोडप्याला सोडवले
बीकेसीजवळच्या एका झोपडीत सापडला नागोबा!
काळ बदलतोय! रणजीत सावरकरांना विधान परिषद सदस्यत्व मिळणार?
युनियन बँकेने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यात मुंबईस्थित एका कंपनीचे तत्कालिन मुख्य व्यवस्थापकीय संचालक, तत्कालिन संचालक व इतरांनी या १७ बँकांच्या समुहाला ३४ हजार ६१५ कोटी रुपयांना फसवले आहे. या बँकांकडून कर्जे घेऊन ती रक्कम यांनी बनावट कंपन्यांची निर्मिती करून त्याद्वारे गुंतविले. या कंपनीने आणि त्या कंपनीच्या मालकांनी अशा बनावट कंपन्या उभ्या केल्या आणि त्यांना ही कर्जे दिली. यासंदर्भात लेखाअहवाल तपासल्यावर हे स्पष्ट झाले की, ही कर्जे कोणत्याही तारणाशिवाय देण्यात आली होती. ईमेल वर केलेल्या संपर्काच्या आधारावर ही कर्जे मंजूर झाली आणि ती वितरितही झाली. याआधी २२ जूनला सीबीआयने केलेल्या छापेमारीत काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली होती.