अंमली पदार्थ नियंत्रण (एनसीबी) विभागाचे मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापा टाकला आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली आहे. तसेच, सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. समीर वानखेडे जेव्हा मुंबई एनसीबीचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी समीर वानखेडे यांनी शाहरुख खान यांच्याकडे पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयकडून छापेमारी केली जात आहे.
या प्रकरणी समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूर येथील मालमत्तांवर सीबीआयकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत.
काय आहे आर्यन खान प्रकरण?
एनसीबीने ऑक्टोबर २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.
हे ही वाचा :
“अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल कल्पना नसल्याचे अजित पवार खोटं बोलत आहेत”
३० हजार पगारी इंजिनीअरचा लाखोंचा थाट!
“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”
“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”
एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅट सादर करून अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. पुढे या प्रकरणाला राजकीय वळण मिळून समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. प्रसिद्धी आणि पैशासाठी हे सर्व घडवण्यात आल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. पुढे आर्यन खान याला या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली आहे.