जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने एकूण ३० ठिकाणी छापे टाकले आहेत. जलविद्युत प्रकल्प गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई सुरू आहे. यापूर्वी सीबीआयने विमा घोटाळ्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई केली होती. तेव्हा सीबीआयने जम्मू- काश्मीरमधील सत्यपाल मलिक आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले होते.
जम्मू- काश्मीरच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली. याशिवाय सीबीआयने ३० ठिकाणी छापे टाकले आहेत. सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते राज्याचे राज्यपाल असताना प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना ३०० कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती.
किरू जलविद्युत परियोजना, एक रन-ऑफ-रिवर योजना, जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यात चिनाब नदीवर प्रस्तावित होणार आहे. प्रकल्पामध्ये प्रत्येकी १५६ मेगावॅट क्षमतेच्या चार युनिट्ससह १३५ मीटर उंच धरण आणि भूमिगत वीजगृह बांधण्याची कल्पना आहे.
मलिक २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू- काश्मीरचे राज्यपाल होते. गेल्या महिन्यातही सीबीआयने या प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकले होते. सीबीआयने गेल्या महिन्यात टाकलेल्या छाप्यात २१ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम याव्यतिरिक्त डिजिटल उपकरणे, संगणक, मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती.
हे ही वाचा:
भारत-चीन सीमाभागात बर्फात अडकलेल्या ५०० जणांची सुटका
शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित; किमान आधारभूत किमतीची मागणी चुकीची
लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!
बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!
तसेच चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स (प्रा.) लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चौधरी हे जम्मू आणि काश्मीर केडरचे (आता AGMUT कॅडर) १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.