मुंबई आणि पुण्यात सध्या सीबीआयची छापेमारी सुरू असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले हे सीबीआयच्या रडारवर आहेत. सीबीआयने अविनाश भोसले यांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू केली आहे. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयची कारवाई सुरू असून अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयचे पथक छापेमारी करत आहे.
मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. तसेच व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी असल्याची माहिती ‘एबीपी माझा’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात येत आहे. त्याचबरोबर विनोद गोयंका आणि शाहिद बलवा यांच्यावर देखील छापे पडल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेतून कुरिअरमधून आणले २७ किलो मारीजुआणा ड्रग्ज; एकाला अटक
MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली
‘इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदेत मुंबई महापालिकेचा घोटाळा’
रशियाने दोन देशांची काढली ‘हवा’
अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील मंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यातच त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालयही आहे. गेल्या वर्षी ईडीने कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.