चार अधीक्षक,२ लेखा परीक्षकांसह ८ जण सीबीआयच्या तावडीत

सीजीएसटी विभागाच्या लाचखोरीचा पर्दाफाश

चार अधीक्षक,२ लेखा परीक्षकांसह ८ जण सीबीआयच्या तावडीत

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) ‘केंद्रीय वस्तू आणि सेवा कर’ (सीजीएसटी) विभागाच्या लाचखोरीचा पर्दाफाश केला आहे. मुंबईतील एका प्रकरणात सीबीआयने मुंबई विभागाच्या सीजीएसटीच्या चार अधीक्षक, दोन लेखा परीक्षक आणि दोन खाजगी व्यक्ती असे एकूण ८ जणांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

 

सीबीआयने लावलेल्या सापळ्यात ६० लाख रुपयांच्या लाच प्रकरणातील ६ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना एका अधीक्षकासह दोन खाजगी व्यक्ती असे एकूण तीन जणांना या प्रकरणात अटक केली आहे. या तिघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १० सप्टेंबर पर्यत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयच्या या कारवाईने सीजीएसटी तसेच जीएसटी विभागात खळबळ उडाली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका व्यवसायिकाने सीबीआय कडे केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास करून मुंबई विभागाच्या ४ सीजीएसटी अधीक्षक, दोन लेखापरीक्षक (सीए) आणि दोन खाजगी व्यक्ती असे एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार व्यवसायिकाने सीबीआयकडे केलेल्या तक्रारीनुसार ४ सप्टेंबर रोजी व्यवसायिकाला मुंबई सांताक्रूझ येथील सीजीएसटी कार्यालयात बोलविण्यात आले होते, व्यवसायिक सीजीएसटी
च्या कार्यालयात गेले असता त्यांना एका खोलीत १८ तास कैद करून ठेवण्यात आले होते.

एका अधीक्षकाने व्यवसायिकाला अटक न करण्यासाठी ८० लाख रुपयांची लाच मागितली होती, तडजोडीअंती ही रक्कम ६० लाख रुपये करण्यात आली. व्यवसायिक तक्रारदाराने सीबीआयला दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे, त्याला ती रक्कम देण्यासाठी इतर तीन अधीक्षकांनी त्याच्यावर दबाव आणला होता, त्याला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली होती. तक्रारदार सीजीएसटी अधिकाऱ्यांच्या कैदेत असताना, त्याच्या चुलत भावाला सीजीएसटी कार्यालयात बोलावून घेण्यात आले आणि तक्रारदाराला अटक न करण्यासाठी ६० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील ३० लाख रुपयांची रक्कम हवाला मार्फत स्वीकारण्यात आली. त्यानंतरच तक्रारदाराला दुसऱ्या दिवशी सीजीएसटी कार्यालयातून बाहेर पडू देण्यात आले, असा आरोप करण्यात आला.

हे ही वाचा:

महावीर फोगाट म्हणतात, विनेशने भाजपात प्रवेश करायला हवा होता!

मणिपूरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन, दारुगोळ्याचा मोठा साठा जप्त !

काँग्रेस, राष्ट्रवादीशपचा पुन्हा सांगली पॅटर्न…

सोनिया ISI च्या एजण्ट नाहीत ; मग, केजीबीच्या आहेत का ?

दरम्यान उर्वरित ३० लाख रुपये रकमेचा लाचेचा ६ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतांना सीबीआयने दोन खाजगी व्यक्तीसह सीजीएसटी अधीक्षकाला ओशिवरा येथे सापळा रचून अटक कऱण्यात आली आहे. सीबीआयने अटक केलेल्या तिघांना मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अटक केलेल्या अधीक्षक आणि लेखा परीक्षक यांना १० सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून २ खासगी व्यक्तींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सीबीआयने अटक आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सीजीएसटी अधीक्षकाच्या मुंबई आणि आजूबाजूच्या निवासस्थानासह ९ ठिकाणी झडती घेण्यात आली असून या झडतीमध्ये महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली असून
तपास सुरू आहे.

Exit mobile version