ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडून ३ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी कथित पत्रकार बिनू वर्गीस, एका इंग्रजी वृत्तपत्राची माजी पत्रकार नाझिया सय्यदसह तिघांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. व्हाट्सएपवर केळकर यांचे कर्मचारी मुलीसोबतचे फोटो व्हायरल करून त्यांची बदनामी थांबवण्यासाठी ही रक्कम वसूल करण्यात आली होती, असे उपायुक्त केळकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
ठाण्यातील ग्लोबल रुग्णालय या ठिकाणी काम करणाऱ्या सफाई कर्माचारी मुलींसोबत असणारे उपायुक्त केळकर यांचे फोटो सोशल मीडिया तसेच पत्रकारांच्या व्हाट्सएप ग्रुपवर व्हायरल करण्यात आले होते. तसेच केळकर हे रुग्णालयातील एका नर्सचा लैगिंग छळ करीत असल्याची माहिती या फोटोसोबत व्हायरल करण्यात आली होती. ही माहिती आणि फोटो ठाण्यातील कथित पत्रकार बिनू वर्गीस हा व्हायरल करीत असल्याचे उपायुक्त केळकर याना कळताच त्यांनी एका मद्यस्थाच्या मदतीने बिनू वर्गीस याच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी केळकर यांनी वर्गीस याला त्या नर्सवर शिस्तंभगाची कारवाई करण्यात आल्यामुळे ती सूड घेण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करीत असल्याचे बिनू वर्गीसला सांगून फोटो व्हायरल करणे थांबवा, असे केळकर यांनी बिनूला सांगितले.
त्यावेळी बिनू याने मुंबईतील एक महिला पत्रकार हिने हे प्रकरण माझ्याकडे सोपवले असून त्यांना आणि मला खर्च असतो, त्यासाठी आम्ही मेहनत करतो त्याची भरपाई तर झाली पाहिजे असे सांगून सस्ते मे निपटाते है, असे सांगून उपायुक्त केळकर यांच्याकडे ५ लाखाची खंडणी मागितली.
हे ही वाचा:
पोलिस कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसा रद्द करा
गणेशमूर्तिकांरांचे नुकसानच नुकसान
‘त्या’ बसचालकाविरोधात गुन्हा दाखल
जून रोजी बिनू वर्गीस हा नर्स ला घेऊन ग्लोबल रुग्णालयात केळकर यांच्या कार्यलयात आला व त्याने प्रकरण मिटवण्याची रक्कम मागितली. त्यावेळी केळकर यांनी माझ्याकडे ३ लाख आहेत, असे सांगून बिनूने तीन लाख रुपये घेऊन एक लाख नर्सच्या हातात टेकवले व एक लाख मुंबईतील पत्रकार महिलेला जाईल, असे सांगून उर्वरित रक्कम लवकर द्या, असे सांगितले. मग बिनू वर्गीस तेथून निघून गेला, अशी माहिती उपायुक केळकर यांनी कापूरबावडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी कथित पत्रकार बिनू वर्गीस, नाझिया सय्यद आणि नर्सविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नाझिया सय्यद हिने माझा या प्रकरणाशी काही संबंध नसून मी बिनू वर्गीस याला ओळखत नाही, असे एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.