सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या तीन महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट गुणपत्रिका बनवल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना टिळक नगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. आरोपींनी पालकांकडून पैसे घेऊन सुमारे ५० विद्यार्थ्यांच्या नावाने बनावट गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला व ईमेल आयडी बनवून त्यांना ११ वीच्या प्रवेश मिळवून दिला, असा आरोप आहे.
सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः पडताळणी समिती स्थापन करून हा सर्वप्रकार उघडकीस आणला. त्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार टिळक नगर पोलिसांना दिली.
के. जे. सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशन पवार यांनी स्वतः याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या के.जे. सोमय्या विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, एस. के सोमय्या विनय मंदिर सेकंडरी स्कू व ज्युनियर कॉलेज व के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य या तीन महाविद्यालयांमध्ये आरोपींनी गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी महेश विष्णु पाटील(४९), अर्जुन वसाराम राठोड(४३) व देवेंद्र सुर्यकांत सायदे(५५) यांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील पाटील हा एस. के सोमय्या विनय मंदिर सेकंडरी स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे लिपीक म्हणून कामाला होता, तर राठोड हा के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालात लिपीक होता. तर तिसरा आरोपी सायदे हा दलाल म्हणून काम करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
महाविद्यालय प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेतील आरोपींनी केलेली फसवणूक शोधून काढली व त्याप्रकरणी आमच्याकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यानंतर आम्ही याप्रकरणी सोमवारी गुन्हा नोंदवला आणि तीन जणांना अटक केली. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून आम्ही याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचे उपायुक्त (परिमंडळ-६) नवनाथ ढवळे यांनी सांगितले.
याप्रकरणात आणखी तीन संशयीत कमलेश भाई, जितू भाई आणि बाबूभाई यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. आरोपींनी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र बनवण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार केल्याचा संशय आहे. दरम्यान, याबाबत सोमय्या महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता आम्हीच याप्रकरणी तपासणी करून हा गैरप्रकार उघडकीस आणला व त्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली, असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले.
हे ही वाचा:
वीज चोरीच्या मुद्द्यावर संभलमध्ये सपा खासदाराच्या घरी ‘स्मार्ट मीटर’
दुसऱ्या दिवशी सभागृहात आलेले उद्धव म्हणाले, मोदीही सभागृहात येत नाहीत!
एडविना-नेहरु प्रकरण देशातील पहिले हनीट्रॅप होते का?
‘योगी की कुर्बानी दे दूंगा’ अशी धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, पिस्तुलही सापडली!
या टोळीने सुमारे ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप आहे. त्यात मुख्यतः सीबीएससी, आयबी, आयसीएसई व आयजीसीएसई सारख्या मंडळातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
प्रवेश पक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यात एसएससी मंडळातील विद्यार्थ्यांची माहिती यंत्रणेत उपलब्ध असल्यामुळे ती माहिती विद्यार्त्याचे नाव व क्रमांक भरला की उर्वरीत माहिती थेट भरली जायची. पण इतर मंडळातील विद्यार्थ्यांचे गुण, शाळा अशी माहिती स्वतः भरावी लागायची. आरोपीने याच गोष्टीचा फायदा उचलून या ५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बनावट गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला व ईमेल आयडी तयार करून खोटी माहिती यंत्रणेत भरली होती. त्या आधारे पालकांकडून पैसे घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.
तक्रारदार प्राचार्य पवार यांना जून महिन्यात याबाबत संशय आला. तीन याद्यांमध्ये नाव नसलेल्या अशा काही संशयास्पद प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता हा प्रकार उघड झाला. पोलीस चौकशीनुसार, आरोपींनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे पोलीस तपासात समजले आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी, इयत्ता ११ वी साठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळून देतो, अशी खोटी माहिती देऊन आरोपींनी पालकांची फसवणूक केली. आरोपींनी यापूर्वीच्या शैंक्षणिक वर्षातही असा गैरप्रकार केला होता का? याबाबतही पोलीस आरोपींची चौकशी करणार आहेत.