एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चाला वेगळं वळण मिळून पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटपट झाली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध पतसंस्था, बँकांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चाला उग्र वळण मिळालं. दरम्यान, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात खासदार इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी बुधवार, ३१ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दहा महिन्यांमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेसह सहा पतसंस्था, सहकारी बँकांमध्ये कोट्यवधींचे घोटाळे उघडकीस आले आहेत. ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याच्या प्रशासनाच्या संथ प्रक्रियेमुळे ठेवीदारांकडून संताप व्यक्त होत होता. या अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हजारो ठेवीदारांनी विभागीय आयुक्तालयासमोर मंगळवार, ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आंदोलन केले.
हे ही वाचा:
१६४ वर्षांपूर्वी भारतात मांडला गेलेला पहिला अर्थसंकल्प! जाणून घ्या अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच हेमंत सोरेन यांना अटक
चक्रव्यूहातून सुटकेचा फक्त आभास…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ५८ आयपीएसच्या बदल्या
आंदोलनासाठी ठराविक जागेवर परवानगी असताना आंदोलकांनी आयुक्तालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. हे करताना गेटचे कुलूप तोडून पोलिसांसोबत झटापट सुद्धा झाली. जमाव हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. यात आंदोलकांसह पोलिसही किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी सरकारी पक्षातर्फे फिर्यादी होत याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल केला.