‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे अध्यक्ष आणि तीन सदस्यांविरोधात मणिपूर सरकारने एफआयआर दाखल केला असल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सोमवारी सांगितले. या चौघांनी राज्यात संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
एडिटर्स गिल्डच्या अध्यक्ष सीमा मुस्तफा, तसेच वरिष्ठ पत्रकार सीमा गुप्ता, भारत भूषण आणि संजय कपूर यांनी ७ ते १० ऑगस्ट या कालावधीत मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराच्या प्रसारमाध्यमांनी केलेल्या वार्तांकनाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचा दौरा केला होता. मणिपूरमध्ये अनेक लोक मारले गेले असताना व बेघर झाले असताना ‘एडिटर्स गिल्ड’ने मणिपूरला भेडसावत असलेल्या संकटाची गुंतागुंत, त्याची पार्श्वभूमी आणि राज्याचा इतिहास समजून न घेता ‘पूर्णपणे एकांगी अहवाल’ प्रसिद्ध केला, असा आरोप मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
राज्यात आणखी चकमकी घडवून आणण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, असा आरोप सिंह यांनी केला आहे. ‘हे लोक विष ओतण्यासाठी आलेले राज्यविरोधी, देशविरोधी आणि सरकारविरोधी लोक आहेत. मला हे पूर्वीच ठाऊक असते तर त्यांना राज्यात प्रवेश करूच दिला नसता,’ असे सिंह म्हणाले.
‘गेल्या चार महिन्यांपासून वांशिक हिंसाचाराला तोंड देणाऱ्या मणिपूरबाबतच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर ‘एडिटर्स गिल्ड’ने गेल्या आठवड्यात प्रकाशित केलेल्या एका वृत्त अहवालात टीका केली आहे. त्यामुळे या अहवालाद्वारे मणिपूरमध्ये हिंसाचार निर्माण करण्यात प्रयत्न करत असल्याबद्दल गिल्डच्या सदस्यांवर एफआयआर दाखल केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
नेपाळला पराभूत करत भारताची सुपर ४ मध्ये धडक
जिल बायडेन करोना पॉझिटिव्ह; जी- २० साठी जो बायडेन यांच्यासह येणार होत्या भारत दौऱ्यावर
आदित्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…
गणेशोत्सवासाठी रेल्वेने पोहोचा फक्त ५० रुपयांत
प्रेस क्लबकडून निषेध
एडिटर्स गिल्डच्या सदस्यांवर गुन्हे दाखल कण्याच्या कृतीचा प्रेस क्लब ऑफ इंडियाने निषेध केला आहे. राज्यात शांतता पुनर्स्थापित करण्याऐवजी संदेशवाहकाला लक्ष्य करण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत एफआयआर तत्काळ मागे घेण्याची मागणी प्रेस क्लब ऑफ इंडियाने निवेदनात केली आहे.