कळव्यातून भाऊचा धक्का येथे मासे खरेदी करण्यासाठी निघालेल्या वाहनाचा पूर्व मुक्त द्रुतगती महामार्गावर मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला.या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून चालकासह ४ जखमी झाले आहे. जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद रामा वायडे (५२) अनिता रामजी जयस्वार (६०) असे अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. खुशबू राजभर,गीता रामनयन राजभर, सुलेखा विनोद वायडे आणि चालक चेतन नंदू पाटील हे तिघे जखमी असून त्यांना उपचारासाठी जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी आणि मृत हे कळवा येथील वाघोबा नगर येथे राहणारे आहेत.मंगळवारी पहाटे मृत आणि जखमी हे इको या वाहनाने मासे खरेदी करण्यासाठी भाऊचा धक्का येथे निघाले होते.
हे ही वाचा:
प्रियांका चतुर्वेदी होणार ‘राष्ट्रवादी’?
मुर्शिदाबाद हिंसाचार: वडील-मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन आरोपींना अटक!
बंगाल वक्फ हिंसाचारात बांगलादेशी बदमाशांचा सहभाग!
‘मोदी काफीर आहेत, त्यांना मत देणारेही काफिर’
पूर्व मुक्त द्रुतगती महामार्गावरून चालक चेतन पाटील हा वाहन भरधाव वेगाने चालवत असताना त्याला वाहन सावकाश चालविणास सांगून देखील त्याने सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, आणि त्याचे भरधाव वेगात असणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑरेंज गेट जवळ वाहन दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला.
या अपघाताची माहिती शिवडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ जेजे रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी विनोद रामा वायडे (५२) अनिता रामजी जयस्वार (६०) यांना मृत घोषित केले असून जखमीना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी चालक चेतन पाटील विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.