पुण्यातील एका वाहन चालकावर मुंबईत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करणारा संदेश आल्यानंतर वाहन चालकाने आपण त्या कालावधीत मुंबईला वाहन घेऊन आलोच नसल्याचे सांगितले.
त्यानंतर पुढील २४ तास त्याच क्रमांकाच्या गाडीचा शोध घेतल्यानंतर गाडी घाटकोपरमधील अमृत नगर झोपडपट्टीजवळ पोलिसांना आढळून आली. बनावट क्रमांक बनवल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली.
पुण्यातील ७० वर्षीय कॅन्सर रुग्ण अनिल शास्त्री यांनी घाटकोपर वाहतूक पोलिसांना कळवले, की त्यांच्या गाडीवर तीन वेळा मुंबईत दंडात्मक कारवाई झाल्याचे संदेश प्राप्त झाले, पण तेव्हा गाडी पुण्यातच होती. जानेवारी महिन्यात उपचारांसाठी ते मुंबईत शेवटचे आले होते. आर्थिक संकटांमुळे ते दंडाची रक्कम भरू शकणार नाहीत. तसेच त्यांनी बऱ्याच काळापासून मुंबईत प्रवासही केला नव्हता, तरीही त्यांना नियम मोडल्या प्रकरणी दंड भरण्याचे ई- चलान संदेश प्राप्त होत होते. तसेच त्यांनी यातील दोषींविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली, असे वाहतूक पोलीस निरीक्षक नागराज मजगे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी
लोकप्रिय कलाकार घेतायत ८० हजार ते दीड लाख रोज
तेहरीक- ए- तालिबानचा बलुचिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला
गर्भवती महिलेला तालिबान्यांनी कुटुंबासमोर घातल्या गोळ्या
जगदुषा नगर, गोळीबार मार्ग, भटवाडी, अमृत नगर, अंधेरी गोरेगाव लिंक रोड या भागात पोलिसांच्या तीन तुकड्या अनिल यांच्या गाडीच्या क्रमांकाची पाटी असलेली गाडी शोधत होत्या. याच भागातून त्या क्रमांकाच्या गाडीवर कारवाई झाली होती. पोलिसांच्या एका तुकडीला अमृत नगर जवळून गाडी सापडली आणि पोलिसांनी ती ताब्यात घेतली. नंतर अंधेरी येथील रहिवासी अशरफ मेमोन आणि धारावीचा रहिवासी शाहरुख खान यांनी पोलीस चौकीत येऊन गाडीविषयी चौकशी केली.
दोघांची अधिक चौकशी केली असता गाडीचा नोंदणी क्रमांक, इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक वेगळाच असल्याचे उघड झाले. दोघांनी ३,८०० रुपयांचा दंड भरल्यावर ही गाडी एका महिलेकडून विकत घेतल्याचे सांगितले. चेसिस नंबरचे पुनर्लेखन करून बनावट क्रमांकाने गाडी दोघांना दिली असण्याची शक्यता आहे, संबंधित प्रकरण पार्क साईट पोलीस ठाण्याला सुपूर्द करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे पार्क साईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक झुबैदा शेख यांनी सांगितले.