पादचाऱ्याला धडक देऊन स्वतः रुग्णालयात दाखल करून पुलावरून खाली पडल्याचा बनाव करणाऱ्या ओला चालकाचा खोटारडेपणा पोलिसांनी समोर आणला आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून हा बनाव समोर आला असून याप्रकरणी जे.जे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून ओला चालकाला अटक केली आहे.
सुफियान खान (२४) असे या ओला चालकाचे नाव आहे. घाटकोपर येथे राहणाऱ्या सुफियान खान हा ओला टॅक्सी चालक आहे. ७ जून रोजी दक्षिण मुंबईतील जे.जे. मार्ग येथील जे.जे पुलाजवळ त्याच्या कारने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली होती. या अपघातात जखमी झालेल्या पादचाऱ्याला सुफियान यानेच स्वतःच्या कारमध्ये टाकून जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी त्याने तेथील पोलिसांना सदर इसम हा जखमी अवस्थेत सापडला असल्याचे खोटे सांगून स्वतःचा बचाव केला.
हे ही वाचा:
ट्विटरवर सुशांत सिंह राजपूत ट्रेंडिंग
आशा सेविकांचा ठाकरे सरकारविरूद्ध संपाचा एल्गार
मुंबईत फहिमची ‘मचमच’ वाढली; निशाण्यावर व्यवसायिक आणि बिल्डर
मुंबईतील व्यावसायिकाला दाऊद गँगकडून धमकीचा फोन
जखमी इसमाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता, सदर इसमाची ओळख पटत नसल्यामुळे जे.जे मार्ग पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी ज्या ठिकाणी हा इसम ओला चालक सुफियान याला जखमी अवस्थेत मिळून आला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर इसमाला एका वॅगनार कारने धडक दिल्याचे दिसून आले.
पोलिसांनी या कारचा शोध घेतला असता ही कार सुफियान शेख याची असल्याचे समोर आले. पोलिसांनी सुफियान याला पोलीस ठाण्यात बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी सुफियान याच्याविरुद्ध निष्कळजीपणे वाहन चालवून पादचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.