कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ भरधाव कारच्या अपघातात धडक दिल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात काम करणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुकेश सिंग याला अटक करण्यात आली आहे.
मुकेश सिंग यांची नुकतीच चालक म्हणून नियुक्ती झाली होती. मेकर चेंबर्समध्ये त्याने त्याच्या मालकाला सोडल्यानंतर मुकेश सिंग याने न सांगता वाहन बाहेर नेले, अशी माहिती कफ परेड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यानंतर सिंग याने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या गेट क्रमांक चारजवळ आसिफ शेख नावाच्या पादचाऱ्याला गाडी ठोकली.
त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात सिंग याने गाडीचा वेग वाढवला आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सहा नंबर क्रमांकाच्या गेटजवळ आणखी दोन पादचाऱ्यांना गाडी ठोकली. नितेश मंडल आणि सुजॉय कुमार विश्वास अशी दोन जखमींची नावे आहेत. हे दोघे भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक महाव्यवस्थापक आणि SBI कॅपिटलचे सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
हे ही वाचा:
संजय राऊत म्हणतात, शिवराळ भाषेत माझ्या वेदना
श्रीलंकेने स्वतःला केले दिवाळखोर घोषित!
मुंबईत १० कोटींचा ड्रग्स जप्त, दोन नायजेरियन अटकेत
धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका
या दोघांना गाडीने उडवल्यावर त्याने एका टॅक्सीला धडक दिली. या टॅक्सीची धडक लागून वरिष्ठ लिपिक प्रसेनजीत गौतम धाडसे हे जखमी झाले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लगेचच मुकेश सिंगला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या वैद्यकीय तपासणीत तो दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे उघड झाले आहे.